हिमाचल प्रदेशातील शक्तीपीठ असलेल्या ज्वालामुखी मंदिरामध्ये मुसलमान अधिकार्‍यांची नियुक्ती ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा आरोप

अधिकार्‍यांचे स्थानांतर केल्याचे जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्टीकरण !

नवी देहली – हिमाचल प्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील सरकारीकरण झालेल्या आणि शक्तीपीठ असणार्‍या ज्वालामुखी मंदिराचे दायित्व अहिंदूंना (मुसलमानांना) सोपवले आहे. राज्यातील अर्ध्याहून अधिक मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. राजकीय नेते आणि अधिकारी हिंदु मंदिरांना स्वतःची खासगी संपत्ती असल्याप्रमाणे चालवत आहेत, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून केला आहे.

या आरोपावर कांगडाचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे की, ज्या २ अधिकार्‍यांविषयी म्हटले गेले आहे त्यांना मागील सरकारकडून वर्ष २००७ मध्ये नियुक्त करण्यात आले होते. (३० डिसेंबर २००७ पर्यंत राज्यात काँग्रेस सत्तेवर होती. तिने जर या शक्तीपीठात अहिंदूंची नियुक्ती केली असेल, तर हिंदूंनी आणि आताच्या भाजप सरकारने तिला जाब विचारणे आवश्यक ! – संपादक)

लोकांनी मंदिराच्या आजूबाजूला त्यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला होता. आता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मी त्यांना मंदिरापासून ५० किमी दूर स्थानांतरित करत मुख्यालयामध्ये बोलावले आहे.