हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक हिंदूने कृतीशील होणे, हीच स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना असेल ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान !

श्री. सुमित सागवेकर

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अखंड हिंदुस्थानचे प्रणेते, मातृभाषेचा अभिमान असलेले, राष्ट्रीय अस्मिता असलेले, दूरदर्शी, प्रतिभासंपन्न क्रांतीवीर साहित्यिक. साहित्यिकही अनेक असतात आणि क्रांतीकारकही अनेक होऊन गेले; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकारांसारखा क्रांतीवीर साहित्यिक हा ‘यासम हाच !’ त्यांनी मार्सेलिसच्या समुद्रात मारलेली जगप्रसिद्ध उडी असूदे किंवा साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेले ‘लेखण्या मोडा आणि बंदुका उचला’ असे आव्हान असू दे, यातून त्यांचे राष्ट्राप्रतीचे प्रगल्भ राष्ट्रप्रेम दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी नितांत आदर वाटे. हे दोघे आपल्या राष्ट्राचे सेनापती, सारथी आणि श्रेष्ठ अधिपती आहेत. ‘स्वतःला हिंदु म्हणवण्यात उणेपणा किंवा अराष्ट्रीयता आहे, असे समजू नका. श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप आणि गुरु गोविंदसिंग यांचा अभिमान बाळगण्यास लाजू नका. या सूर्यमंडळात हिंदूंसाठी एक देश असलाच पाहिजे आणि तेथे त्यांची भरभराट झालीच पाहिजे’, असे ते सांगत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक हिंदूंने कृतीशील झाले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्रवीर सावरकर स्मृतीदिनानिमित्त १९ मार्च या दिवशी ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. क्रांतीची प्रेरणा देणारी वीर सावरकर यांची वास्तू आणि राष्ट्रकार्यासाठी झटतांना त्यांनी वापरलेल्या वस्तू यांची छायाचित्रे या वेळी दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप गवंडी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केली.

उपस्थितांचे मनोगत 

१. स्वातंत्रवीर सावरकरांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले. सावरकरांची बलीदानाची भावना लक्षात ठेवून आपण काही ना काही बलीदान केले, तरच राष्ट्र वाचवू शकतो.

– श्री. सुनील मांगले

२. आजच्या पिढीत सावरकरांविषयी भावना निर्माण करणे आवश्यक आहे. आम्ही लहानपणापासून त्यांना लक्षात ठेवले; परंतु आता पुढील पिढीलाही त्याची जाणीव करून द्यायला हवी.

– श्री. गौरव देवरुखकर