भीषण आपत्काळात औषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड करा !

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी अ‍ॅलोपॅथीतील औषधांचा नव्हे, तर आयुर्वेदीय औषधी वनस्पतींचा आधार असणार आहे. भीषण आपत्काळात अल्पमोली अन् बहुगुणी असलेल्या आयुर्वेदीय औषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड करणे आवश्यक आहे. पुढे येणार्‍या आपत्काळात आपल्याला औषधे मिळणे अशक्य होईल. तेव्हा आपल्याला या दैवी वृक्षांचाच आधार असेल. दैवी वनस्पतींना ‘झाडपाला’ म्हणून हिणवणार्‍यांना पुढे दैवी वनस्पतींनाच शरण जावे लागेल. एखाद्या देवतेची आपण उपासना करतो, त्या भावाने दैवी वृक्षांची उपासना, म्हणजे जोपासना करा ! तुमच्यातील भावाने वृक्षांतील दैवी तत्त्वाचे प्रमाण वाढायला साहाय्य होईल.

विविध विकारांवर उपयुक्त ठरणार्‍या औषधी वनस्पती !

१. तुळस : सर्दी, खोकला, ताप, कफाचे विकार, व्रण (जखम) बी : उष्णतेचे विकार

२. दूर्वा : नाकातून रक्त येणे, वाईट स्वप्ने पडणे, उष्णता

३. वसू (पुनर्नवा): मूतखडा, मूत्रपिंडाची कार्यक्षमता न्यून होणे, यांसारखे मूत्रवहनसंस्थेचे विकार, ताप, सूज येणे

४. कारिवणा (ब्राह्मी) : झोप, पित्त आणि मज्जासंस्थेचे विकार

५. अनंतमूळ : रक्ताशी संबंधित विकार

६. गवती चहा : सर्दी, खोकला, ताप

७. माका : अर्धशिशी, केसांचे विकार, तोंड येणे, पचनसंस्थेचे विकार, मेदाच्या (चरबीच्या) गाठी

८. शतावरी : स्त्रियांचे विकार, अशक्तपणा

९. किराइत : ताप, रक्त, पित्त आणि त्वचेशी संबंधित विकार

१०. पिंपळी : पचनसंस्थेचे विकार, वाताचे विकार

११. पुदीना : पचनसंस्थेचे विकार

१२. वेखंड : डोकेदुखी, कफाचे विकार

१३. गुळवेल किंवा अमृतवेल : ताप, संधीवात, अशक्तपणा, रक्ताशी संबंधित विकार

१४. गुडमार : मधुमेह, स्थूलपणा

१५. अडुळसा : ओला (कफ पडणारा) खोकला, नाकातून रक्तस्राव होणे, कावीळ, पित्ताचे विकार

१६. एरंड : वातामुळे होणार्‍या वेदना, संधीवात

१७. प्राजक्त : पित्ताचे विकार, ताप, खोकला, संधीवात

१८. वाळा : उष्णता, उलटी, मलेरिया

  • औषधी वनस्पतींच्या भोवतालचे वातावरण जेवढे सात्त्विक असेल, तेवढ्या त्या अधिक सात्त्विक होतात. जेवढा सत्त्वगुण जास्त, तेवढेच वनस्पतींमधील औषधी गुणही वाढतात. साधनेमुळे सत्त्वगुण वाढतो.
  • औषधी वनस्पती लावतांना त्या वनस्पतीलाही प्रार्थना करावी – ‘हे औषधी वनस्पती, तुझ्यात आणि माझ्यात मित्रत्वाचे नाते निर्माण होऊ दे. तुझ्यापासून रुग्णाइत माणसांना त्यांचे रोग दूर होण्यास साहाय्य होऊ दे.’
  • लागवडीच्या ठिकाणी चैतन्य टिकून रहावे; म्हणून लागवडक्षेत्रात प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या उच्चकोटीच्या संतांच्या आवाजातील भजनांची ध्वनीफीत लावून ठेवावी. प्रतिदिन अग्निहोत्र करावे.
  • लागवडीच्या क्षेत्रामध्ये नियमितपणे अग्निहोत्रातील, यज्ञातील, देवळातील किंवा सात्त्विक उदबत्तीपासून बनलेली विभूती फुंकरावी. यामुळे क्षेत्रातील त्रासदायक शक्ती दूर होण्यास साहाय्य होते.