श्रीलंकेमध्ये बुरखा बंदीवरून पाकचा संताप

पाकने कधी जिहादी आतंकवादी कारवायांमध्ये मारल्या जाणार्‍या निरपराध्यांविषयी दुःख व्यक्त केले आहे का ?

इस्लामाबाद (पाकिस्तान) – बुरख्यावर बंदी घातल्याने जगभरातील मुसलमानांच्या  भावना दुखावल्या जातील. कोरोनामुळे आधीच श्रीलंका अनेक समस्यांचा सामना करत आहे आणि आंतरराष्ट्रीय मंचावरही श्रीलंकेला तिच्या प्रतिमेविषयी अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. (श्रीलंकेची जागतिक स्तरावर प्रतिमा कशी आहे, याचा विचार करण्याऐवजी पाकने स्वतःची जगात काय प्रतिमा काय आहे, याचा विचार करावा ! – संपादक) अशा कठीण आर्थिक परिस्थितत सुरक्षेच्या नावाखाली विभाजनकारी पाऊल उचलल्याने अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकाराविषयीचे प्रश्‍न अधिक वाढतील, अशी प्रतिक्रिया पाकचे उच्चायुक्त साद खट्टाक यांनी व्यक्त केली आहे. श्रीलंकेतील बुरखा बंदीच्या प्रस्तावावर ट्वीट करत त्यांनी हे विधान केले. श्रीलंकेमध्ये बुरखा आणि मदरसा यांच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे.


संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत आठवड्याभरात श्रीलंकेच्या मनवाधिकार अहवालावर सुनावणी होणार आहे. यामध्ये सदस्य देश मतदानात भाग घेतील. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानही एक सदस्य आहे आणि पाकच्या उच्चायुक्तांनी याकडेच बोट दाखवले आहे.