वसीम रिझवी यांना इस्लाममधून बहिष्कृत करण्याची धर्मांधांची मागणी !

कुराणमधून जिहादी आतंकवादाला प्रोत्साहन देणारी २६ आयते काढण्याची मागणी केल्याचे प्रकरण

  • अंनिससारख्या संघटना हिंदु धर्मातील कथित अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना ‘ते अन्य धर्मांतील अंधश्रद्धा दूर का करत नाहीत ?’ असे विचारल्यावर ‘स्वतःच्या धर्मातील अंधश्रद्धा आधी दूर केली पाहिजे’, असे म्हणतात. आता रिझवी यांनी काहीसा तसाच प्रयत्न केला आहे, असे अंनिससारख्या संघटना का म्हणत नाहीत ?
  • जातीपातींमुळे एखाद्याला बहिष्कृत केल्याची घटना एखाद्या खेडेगावात घडली, तर लगेच पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी संघटना तेथे धावून जातात आणि त्याचा विरोध करतात; मात्र अशा घटनांविषयी ते आणि भारतीय प्रसारमाध्यमे सोयीस्कर मौन बाळगतात !
  • एखाद्या व्यक्तीवर बहिष्कार टाकणे, हा गुन्हा असल्याने रिझवी यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करणार्‍यांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य सरकारी यंत्रणा दाखवतील का ?
शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी

नवी देहली – जिहादी आतंकवादाला प्रोत्साहन देणारी कुराणातील २६ आयते काढून टाकण्याची मागणी करणारी जनहित याचिका शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केल्यावर त्यांचा शिरच्छेद करण्याचा फतवा निघाला आहे. आता त्यांना इस्लाममधूनच काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. रिझवी यांच्या मागणीमळे त्यांची पत्नी, मुले, भाऊ आणि अन्य नातेवाइक यांनी त्यांच्याशी असलेले संबंध तोडले आहेत. तसेच त्यांची लक्ष्मणपुरी येथील ‘हयात कब्र’ (मृत्यूपूर्वीच कबरीसाठी जागा आरक्षित करणे) तोडून टाकण्यात आली आहे.

(सौजन्य : Ladakh Now)

उलेमांनी केंद्र आणि राज्य सरकारांकडे वसीम रिझवी यांना अटक करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने रिझवी यांची याचिका फेटाळून लावत त्यांना मोठा दंड लावावा, अशी मागणीही न्यायालयाकडे करण्यात आली. भाजप अल्पसंख्यांक नेते जीशान खान यांच्यासहीत अनेक मौलानांनी रिझवी यांच्या घराबाहेर कुराणातल्या त्याच २६ आयतींचे पठण केले ज्यांना हटवण्याची मागणी रिझवी यांनी केली आहे.

शेवटच्या श्‍वासापर्यंत लढत रहाणार ! – वसीम रिझवी

वसीम रिझवी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून या विषयावर त्यांचे म्हणणे मांडले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘मी आयते काढण्याची मागणी केल्यानंतर पत्नी आणि मुलेही मला सोडून गेली आहेत. विरोधानंतरही मी या लढाईतून माघार घेणार नाही. शेवटच्या श्‍वासापर्यंत मी या विषयावर लढत रहाणार आहे. पराभूत झाल्याची निश्‍चिती झाल्यानंतर मी आत्महत्येचा मार्ग पत्करीन.’

तसेच रिझवी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, देशभरातून माझा शिरच्छेद करण्याचे फतवे काढले जात आहेत. मी मानवतेसाठी उभा ठाकलो, हे अयोग्य केले का ? तुम्ही सर्व भारतवासी मला साथ देणार का ?’ असे प्रश्‍न त्यांनी विचारले आहेत.