पुणे येथील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर सायबर आक्रमण, ५ कोटींची हानी

हॅकरकडून बिटकॉईनची मागणी


पुणे, १० मार्च – येथील पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर सायबर आक्रमण झाल्याचे समोर आले असून अज्ञात परदेशी हॅकरने बिटकॉईनची (ऑनलाईन चलन) मागणी केली आहे. रॅन्समवेअरने आक्रमण केल्याचे उघड झाले आहे. (रॅन्समवेअरमध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणि तुमच्याकडे खंडणीची मागणी करतो. या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात.) २७ सर्व्हरमधील डेटा इनक्रिप्ट (नासधूस) करण्यात आला आहे. त्यामुळे ५ कोटींची हानी झाली असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हणले आहे; पण हा डेटा परत मिळवला जाऊ शकतो, असे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे. हा प्रकार २६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी घडला आणि या प्रकरणी ९ मार्च या दिवशी तक्रार दिल्यानंतर ही घटना उजेडात आली आहे. १०० कोटींपेक्षा अधिक व्यय करून विकास प्रकल्प राबवणारी स्मार्ट सिटी ही संस्था नागरिक आणि प्रकल्प या संदर्भातील गोपनीय माहितीही सुरक्षित ठेवू शकत नाही का ?, असा प्रश्‍न या प्रकाराने उपस्थित होत आहे.

या प्रकरणी टेक महिंद्राचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लाठी यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले असल्याची माहिती सायबर विभागाकडून देण्यात आली आहे. नेमका कोणता आणि किती महत्त्वाचा डेटा इन्क्रीप्ट (नासधूस) केला गेला याची पूर्णतः माहिती अद्यापही मिळाली नाही.

हॅकरने हा डेटा इनक्रिप्ट केला असून तो पुन्हा त्यांनाच डिस्क्रिप्ट करता येतो. त्यामुळे ते बिटकॉईनच्या स्वरूपात खंडणीची मागणी करत आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे. शहरातील निगडी परिसरात असणार्‍या अस्तित्व हॉल येथे स्मार्ट सिटी प्रकल्पाचा नुकताच आरंभ झाला होता. अधिकार्‍यांनी पूर्ण काम चालू केले नव्हते. सॉफ्टवेअर लॉन्च करण्याच्या अगोदर हे सायबर आक्रमण झाले असून रेकी करून हे सायबर आक्रमण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकारी नीलकंठ पोमण यांना विचारले असता या घटनेशी महापालिकेचा काहीही संबध नाही. तक्रार देणार्‍या संबंधित संस्थेकडे डेटा इन्स्टॉलेशनचा ठेका आहे, तेच काम करत असतांना हे सायबर आक्रमण झाले असल्याची माहिती मिळाल्याचे पोमण यांनी सांगितले. इन्क्रीप्ट झालेला डेटाही महत्त्वपूर्ण नसल्याचा दावा पोमण यांनी केला आहे. तसेच या घटनेत ५ कोटी रुपयांची हानी झाल्याचे टेक महिंद्राने स्पष्ट केले आहे, त्याविषयी विचार करू, असे पोमण यांनी सांगितले.