मिरज – भक्ती, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सुरेख संगम साधत मिरजेत कृष्णामाई उत्सव साजरा करण्यात आला. मिरजेतील ऐतिहासिक कृष्णा घाट येथे मार्कंडेय मंदिराच्या घाटावर या उत्सवात प्रथम २० फेब्रुवारी या दिवशी महानगरपालिका आणि कृष्णा वेणी उत्सव समितीचे संयुक्त विद्यमाने घाट, नदी पात्राची वाट यांची स्वच्छता करण्यात आली. २२ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ वाजता अंबाबाई मंदिर येथून श्री कृष्णामाई पालखी मिरवणूक काढण्यात आली. मूर्ती प्रतिष्ठापना, पूजा विधी इत्यादी झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता श्री रामकृपा भजनी मंडळ यांचे भजन झाले.
यानंतर डॉ. मनोज पाटील यांचे पर्यावरणाविषयी व्याख्यान झाल्यानंतर सौ. आमिषा करंबेळकर यांचे कथ्थक नृत्य, तसेच सौ. रश्मी सावंत, सौ. वैशाली जोगळेकर, श्री. बाजीराव कोपार्डे, श्रावणी सांगरोळकर यांचे गायन झाले. शेवटी श्री कृष्णामाईची महाआरती आणि मिरजेतील पुरोहित यांचे मंत्रपुष्प असे धार्मिक अन् सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमात समितीचे निमंत्रक श्री. ओंकार शुक्ल आणि श्री. ऋषिकेश कुलकर्णी यांनी आरती केली. सायंकाळी घाटावर दिवे लावण्यात आले होते. यामुळे सूर्यास्तानंतर संपूर्ण घाट मंगलमय झाला होता. या वेळी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणार्या डॉ. शेखर राजदेरकर यांचा सन्मान करण्यात आला.
या उत्सवास मिरजेच्या राणी सरकार सौ. पद्माराजे पटवर्धन, श्री. किशोर पटवर्धन सौ. इरावती पटवर्धन, डॉ. महादेव कुरणे यांसह अन्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत. या उत्सवाच्या आयोजनात श्री. दिगंबर कुलकर्णी, सौ. रूपाली देसाई, सौ. अनघा कुलकर्णी, सर्वश्री श्रीपाद भट, संतोष कुलकर्णी, राजन काकीरडे, महेश पोंक्षे, कुश आठवले, अरविंद रूपलग यांसह अन्यांचा संयोजनात सहभाग होता.