आम्ही कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता दिलेली नाही ! – जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

योगऋषी रामदेवबाबा यांनी ‘कोरोनिल’ला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याचा केला होता दावा !

या पूर्ण वादावर पडदा टाकण्यासाठी केंद्र सरकारने ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. आयुर्वेदीय औषधोपचाराने कोरोना बरा झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे कुणाच्या प्रमाणपत्रांची वाट न पहाता केंद्र सरकारने आयुर्वेदीय औषधोपचार करणार्‍यांना अभय देणे आवश्यक !

नवी देहली – ‘पतंजलि आयुर्वेद’ या आस्थापनाने कोरोनावर बनवलेल्या ‘कोरोनिल’ या औषधाला आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणन योजनेनुसार प्रमाणपत्र बहाल केले आहे, अशी माहिती योगऋषी रामदेवबाबा यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दिली होती; मात्र या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण आशियाच्या संदर्भातील ट्विटर खात्यावरूने, ‘कोरोनाच्या संदर्भातील कोणत्याही पारंपरिक औषधाला आम्ही अनुमती दिलेली नाही’, असे ट्वीट करून सांगण्यात आले आहे.

‘कोरोनिल’ला मान्यता मिळाल्याचे सिद्ध करा ! – इंडियन मेडिकल असोसिएशनचे आव्हान

इंडियन मेडिकल असोसिएशन जनतेच्या काळजीपोटी हे सांगत आहे कि आयुर्वेदाच्या द्वेषापायी असे आव्हान देत आहे, हे पहावे लागेल; कारण भारतातच नव्हे, तर जगभरात अ‍ॅलोपेथी औषधोपचार करणार्‍यांना आयुर्वेदाचे वावगे असते, हेच बर्‍याचदा समोर आले आहे !  

इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम्.ए.) या डॉक्टरांच्या अधिकृत संघटनेनेही ‘कोरोनिल’ला विरोध केला आहे. ‘या औषधाला कुठल्याच मान्यताप्राप्त अधिकृत संघटनेकडून मान्यता मिळालेली नाही, ती मिळाली असल्यास तसे सिद्ध करावे’, असे आव्हानही तिने दिले आहे.

‘हा प्रकार पूर्णपणे सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा आणि त्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे. जिथे लस येण्यासाठी इतक्या मासांचा कालावधी लागला, तिथे हे औषध कसे उपलब्ध झाले ? त्याला कुणी मान्यता दिली ?’, असे प्रश्‍न आय.एम्.ए.ने उपस्थित केले आहेत.