१६.७.२०२० या दिवशीच्या भाववृद्धी सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी गुरूंची महती वर्णन करतांना सांगितले, गुरूंची शिष्यावर एवढी कृपा असते की, शिष्य कुठेही, कधीही आणि कसल्याही संकटात सापडला, तरी ते त्याचे रक्षण करण्यास त्वरित प्रकट होतात. हे ऐकल्यावर मला वर्ष १९९८ मध्ये मी कुडाळ सेवाकेंद्रात पूर्णवेळ सेवा करत असतांनाचा एक प्रसंग आठवला.
१. रात्री खोलीच्या बाहेर उघड्यावर झोपलो असतांना सकाळी जाग आल्यावर अंथरुणाची घडी करत असतांना उशीखाली अंदाजे बोटभर जाडीचे आणि ८ – ९ इंच लांबीचे एक विषारी फुरसे मरून पडलेले आढळणे अन् ते काही वेळापूर्वीच उशीखाली आले असावे, असे वाटणे
कै. रंजन देसाई यांनी त्यांची लहानशी खोली सनातन संस्थेला कार्यालय म्हणून उपलब्ध करून दिली होती. त्या खोलीत आवश्यक ते साहित्य असल्याने तेथे वावरायला फारशी मोकळी जागा नव्हती. मी त्या खोलीत रात्रं-दिवस असायचोे. खोलीला केवळ एकच दार असून खिडकी नव्हती आणि पंखाही नव्हता. ती खोली कारखान्याच्या भट्टीला लागूनच असल्याने त्या बाजूची भिंतही तापत असे. उन्हाळ्यात खोलीत पुष्कळ गरम व्हायचे. मी रात्री दाराच्या बाहेर अंथरूण घालून उघड्यावरच झोपत असे. दारासमोरची वाट खडबडीत होती. सभोवताली रानगवत आणि काटेरी झुडपे होती. समोर १० ते १२ फुटांवर कुंपण आणि त्या पलीकडे रहदारीचा डांबरी मार्ग होता.
एकदा सकाळी मला ५.३० वाजता जाग येऊन मी अंथरुणाची घडी करत असतांना उशीखाली अनुमाने बोटभर जाडीचे आणि ८ – ९ इंच लांबीचे एक विषारी फुरसे मरून पडले आहे, असे मला दिसले. त्याचे तोंड ठेचलेले, ताज्या रक्ताने माखलेले होते. रक्त ताजे दिसत असल्यामुळे ते काही वेळापूर्वीच उशीखाली आले असावेे, असे वाटले.
२. त्या फुरशाचे डोके ठेचून त्याला यमसदनी पाठवणारे कोण असावेत ? मला त्याच्या दंशापासून वाचवणारे कोण असेल ? ती माझी गुरुमाऊलीच होती ना ! या प्रसंगातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या बोलण्यातील सत्यता पटते. मी ती प्रत्यक्ष अनुभवली आहे.
फुरशाने दंश केलेल्या व्यक्तीला काही घंट्यांत (२ – ३ घंट्यांत) उपचार न मिळाल्यास ती जगत नाही, असे म्हणतात. माझ्या आत्याच्या मुलाचा (वय २० ते २२ वर्षे) असाच फुरशाच्या दंशाने वेळीच उपाय न मिळाल्याने मृत्यू झाला आहे.
– (पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.८.२०२०)