दळणवळण बंदी नंतर स्वामींच्या दर्शनाने समाधान लाभले ! – विजयसिंह मोहिते पाटील

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा सत्कार करतांना मंदिर समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे

अक्कलकोट – मी आणि माझे कुटुंबीय श्री स्वामी समर्थ यांचे निस्सिम भक्त असून गेल्या वर्षभरापासून आम्ही स्वामी दर्शनापासून वंचित होतो. कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडल्याने अत्यंत समाधान लाभले आहे, असे मनोगत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.

येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते. या वेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्‍वस्त महेश गोगी, आदींसह दैनिक अक्कलकोट समर्थचे संपादक प्रवीण देशमुख, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी, मंदार महाराज पुजारी, मल्लिनाथ स्वामी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार आदी उपस्थित होते. मंदिर समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी मंदिर समितीच्या वतीने विजयसिंह मोहिते-पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. या वेळी मोहिते-पाटील यांनी मंदिर आणि परिसरातील समितीच्या वतीने करण्यात आलेेेली विविध विकासकामे पाहून समाधान व्यक्त केले.