मालवण – शहरातील कचरा नेणारी यंत्रणा जाणीवपूर्वक बंद करण्यात आली असून यामुळे शहरात कचर्याचे ठिकठिकाणी ढीग दिसत आहेत. याविषयी वारंवार लक्ष वेधूनही नगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिक स्थानिक नगरसेवकांवर रोष व्यक्त करत आहेत. ही यंत्रणा पूर्वीप्रमाणे चालू करावी अन्यथा नागरिकांना कचरा नगरपालिकेच्या दारात आणून टाकावा लागेल, अशी चेतावणी माजी आरोग्य सभापती आणि नगरसेवक आप्पा लुडबे यांनी मालवण नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना निवेदनाद्वारे दिली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मालवण शहरात कचरा उचलण्याची सुयोग्य यंत्रणा मागील ३ वर्षांपासून चालू होती. शहरातील प्रत्येक घरातून कचरा घेण्यासाठी कर्मचारी नियुक्त केला आहे; परंतु त्यांना दिलेले वाहन बंद आहे. नागरिकांनी कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास त्यांना दंड करण्याची भीती दाखवली जाते; मात्र त्यांच्या घराजवळून कचरा उचलला जात नाही. अशा वेळी नागरिकांनी काय करावे ? हे त्यांना कळत नाही. कचर्याची ही समस्या वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी, तसेच वृत्तपत्रांनी नगरपालिका सभागृह, तसेच प्रशासन यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तरीही त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. (लोकप्रतिनिधींनाही न जुमानणारे प्रशासन सर्वसामान्य जनतेशी कसे वागत असेल, याचा विचार न केलेला बरा ! – संपादक) शहराप्रमाणेच माझ्या वायरी प्रभागातही कचर्याची समस्या निर्माण झालेली आहे. यावर पुढील १५ दिवसांत घरोघरी कचरा उचलण्याची व्यवस्था पूर्वीप्रमाणे चालू न झाल्यास प्रभागातील नागरिकांना घेऊन घरातील कचरा नगरपालिकेच्या दारात आणून टाकावा लागेल.