सातारा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १९ फेब्रुवारी अर्थात् शिवजयंतीदिनी संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहे. १०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करण्याची अनुमती देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्रतिवर्षी शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते; मात्र या वर्षी कोरोनामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक आदींचे सादरीकरण करण्यात येऊ नये. तसेच कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत. कोणत्याही प्रभात फेर्या, वाहन फेर्या, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात यावा. सामाजिक अंतर ठेवून हा उत्सव साजरा करावा.