सनातन संस्कृतीचे श्रेष्ठत्व आधुनिक विज्ञानाला मान्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

जोधपूर (राजस्थान) – ‘ज्योतिष शास्त्र नाही’, ‘आमच्याहून कितीतरी लांब असलेल्या ग्रहांचा मानवांवर परिणाम कसा होईल ?’, असा सनातन धर्माच्या विरोधकांकडून प्रचार केला जातो; परंतु आज आधुनिक विज्ञानही मान्य करते की, अमावास्या आणि पौर्णिमा यांचा मानवाच्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. ‘समुद्रामध्येे येणारी भरती ही ग्रहांमुळे येत असते’, ही गोष्ट आधुनिक विज्ञानाने शोध लावण्यापूर्वी आम्हाला ठाऊक होती. असे असतांना आज आधुनिकतेच्या नावावर आपण आपली वैज्ञानिक संस्कृती विसरत चाललो आहोेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. काही दिवसांपूर्वी ‘सुरेश राठी अ‍ॅण्ड ग्रुप’च्या वतीने ‘सनातन संस्कृतीची वैज्ञानिकता’ या विषयावर ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनीही संबोधित केले. या कार्यक्रमाचा १११ जिज्ञासूंनी लाभ घेतला.

अध्यात्मानेच आनंदप्राप्ती शक्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘फॅशनचे असात्त्विक अलंकार परिधान केल्याने लोक तुमची प्रशंसा करतील; परंतु त्यांचा आपले मन आणि ऊर्जा यांवर विपरित परिणाम होत असेल, तर त्याचा उपयोग काय ? धन आहे; पण घरात सुख नाही. कुणी कुणाचे ऐकत नाही. प्रत्येक जण एकमेकाला कोसतो आहे. मन निराश आणि दु:खी असेल, तर धनाचा उपयोग काय ? अनुकूलतेमुळे आम्ही सुखी आणि प्रतिकूलतेमुळे दु:खी होत असू, तर अशा वेळी आम्हाला आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म अन् साधना यांकडे वळणे आवश्यक आहे; कारण अध्यात्मानेच आनंदप्राप्ती शक्य आहे.’’

धर्माचरणामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त करू शकतो ! – आनंद जाखोटिया

श्री. आनंद जाखोटिया

धर्माचरण जीवनातील अपरिचित अंगांना उघड करते. ‘सुखाचे मूळ धर्मात आहे’, असे शास्त्र सांगते. याचा विसर पडल्याने धर्माचरण आणि त्याची वैज्ञानिकता यांकडे दुर्लक्ष होत आहे. ऋषिमुनींनी सांगितलेल्या आहार, विहार, वस्त्र, दिनचर्या आदी विषयांशी संबंधित कृती सध्या आधुनिक विज्ञानानेही उपयुक्त सिद्ध होत आहेत. धर्माचरणानेच सकारात्मक ऊर्जा प्राप्त करू शकतो.

कु. वेदिका मोदी

सनातनची ५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली बालसाधिका कु. वेदिका मोदी हिच्या आदर्श उदाहरणामुळे जिज्ञासू प्रभावित !

सनातनची ५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली जोधपूर येथील बालसाधिका कु. वेदिका मोदी हिने शाळेत केेलेल्या सादरीकरणामुळे प्रभावित होऊन श्री. सुरेश राठी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सध्याच्या काळात इच्छा असतांनाही मुलांना आपल्या संस्कृतीशी जोडणे शक्य होत नाही, अशी अनेक पालकांची चिंता असते; परंतु आपल्या घरातच अध्यात्म किंवा साधना यांचे वातावरण मिळाले, तर बाह्य वातावरणाचा मुलांवर परिणाम होत नाही. याचे आदर्श उदाहरण जोधपूर येथील बालसाधिका कु. वेदिका मोदी (वय १३ वर्षे) हिच्या ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांना अनुभवायला मिळाले.

क्षणचित्रे

१. सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी केेलेल्या परिपूर्ण शंकानिरसनामुळे जिज्ञासूंना मनापासून आनंद झाला.

२. सनातन संस्कृतीची वैज्ञानिकता कुटुंबांमध्ये पोचावी, यासाठी सनातनच्या ‘धर्मशिक्षण फलक’ या ग्रंथांच्या १०० प्रती वितरित करण्याची श्री. सुरेश राठी यांनी इच्छा व्यक्त केली.

३. या कार्यक्रमामध्ये कु. वेदिका मोदी हिने हिंदु संस्कृतीचे पूर्णपणे पालन करण्यासाठी ती करत असलेले प्रयत्न सांगितले. तसेच तिने एका संस्कृत कथेचे हिंदीमध्ये भाषांतर करून सांगितले.

हा कार्यक्रम पहा…