शेतकर्‍यांचे अधीक्षक अभियंता कार्यालयात ‘ठिय्या आंदोलन’

वीजपंपांची जोडणी तोडल्याचे प्रकरण

जालना – वीजवितरण आस्थापनाने वीज पंपासाठी पुरवलेला वीजपुरवठा थकित वीज देयकापोटी खंडित केल्याच्या प्रकरणी संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी वीज वितरण आस्थापनाच्या कन्हैयानगर भागात असलेल्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ११ फेब्रुवारी या दिवशी ‘ठिय्या आंदोलन’ केले. बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी आंदोलकांची भेट घेऊन मध्यस्थी केली. १० फेब्रुवारीपासून वीज वितरण आस्थापनाने ज्या शेतकर्‍यांकडे वीज पंपाचे थकित वीज देयक आहे, त्यांचा पुरवठा खंडित करण्याचा सपाटा चालू केला आहे. अचानक चालू झालेल्या या कारवाईमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. उन्हाळा तोंडावर आल्याने पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. त्यातच वीज आस्थापनाने वीज जोडणी तोडल्याने पिकांना पाणी न मिळाल्यास, हाती आलेले पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आमदार नारायण कुचे यांनी या प्रकरणी मध्यस्थी करून अधीक्षक अभियंता यांची भेट घेतली. ‘तूर्तास वीजपुरवठा खंडित करू नये’, असे निवेदन दिले, तसेच वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी शेतकर्‍यांना सूचना द्यावी आणि सध्या काही मुदत दिली असेल, तर ती वाढवून द्यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.