प्रदूषणामुळे तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) नंतर आता शिरोळ बंधार्‍यात सहस्रो मासे मृत्यूमुखी

निष्क्रीय आणि दायित्वशून्य प्रदूषण मंडळ !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – येथील शिरोळ बंधार्‍यात ७ फेब्रुवारी या दिवशी सहस्रो मासे मृत्यूमुखी पडले असून पाण्याला दुर्गंध येत आहे. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्‍न पुन्हा एकदा समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन प्रदूषणास उत्तरदायी असणार्‍या घटकांवर कारवाई करा, असे आदेश दिले होते; परंतु अजूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. नदी प्रदूषित करणार्‍या घटकांवर कारवाई व्हावी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग यावी, यासाठी पंचगंगा काठाचे नागरिक वारंवार आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) बंधार्‍यात मासे मृत्यूमुखी पडले होते.

१ मासापूर्वी आंदोलन करणार्‍या स्वाभिमानीच्या ५ कार्यकर्त्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी प्रशासकीय कामात अडथळा आणला; म्हणून गुन्हा नोंद केला होता. हा प्रश्‍न विधानसभा आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत गेला होता; परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे समोर येत आहे.