मथुरेतील शाही ईदगाह मशिदीला पूर्णपणे हटवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली

सर्व पक्षकारांना नोटीस जारी

हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या स्वतःच्या न्याय्यहक्कांसाठी एकतर आंदोलन करावे लागते किंवा न्यायालयात जावे लागते, हे संतापजनक आहे ! अशा घटनांवरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !

श्रीकृष्णजन्मभूमीवर अतिक्रमण केलेली शाही ईदगाह मशीद

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर अतिक्रमण करून मोगल बादशहा औरंगजेबाने बनवलेली शाही ईदगाह मशीद हटवण्यासाठी येथील न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेली याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे. यासह या संदर्भातील पक्षकारांना नोटीसही बजावली आहे. त्यांना त्यांचा पक्ष न्यायालयात मांडण्यास सांगितले आहे. नोटीस बजावलेल्यांमध्ये उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष, शाही ईदगाह व्यवस्थापन समितीचे सचिव, श्रीकृष्णजन्मभूमी ट्रस्टचे व्यवस्थापक विश्‍वस्त आणि  श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानचे सचिव यांचा समावेश आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश देवकांत शुक्ला यांनी ही याचिका स्वीकारून नोटीस बजावली आहे. यावर ८ मार्च या दिवशी सर्वांना त्यांचा पक्ष न्यायालयासमोर मांडावा लागणार आहे.


जुन्या कटरा केशवदेव मंदिराची देवता ठाकुर केशव देव महाराज विराजमान यांच्याकडून त्यांचे सेवादार पवनकुमार शास्त्री यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. यात त्यांनी पुढील ३ मागण्या केल्या आहेत.

अ. शाही ईदगाह मशीद असणार्‍या भूमीसह संपूर्ण केशव देव मंदिराचा १३.७ एकर भूमी परिसर मंदिर व्यवस्थापन समितीला मिळावा.

आ. श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही ईदगाह व्यवस्थापन समिती यांच्यामध्ये झालेल्या कराराला मान्यता देणारा मथुरा न्यायालयाचा वर्ष १९६७ चा आदेश रहित करण्यात यावा. या आदेशाद्वारे मंदिराच्या शेजारी मशीद ठेवण्यास अनुमती देण्यात आली होती.

इ. शाही ईदगाह व्यवस्थापन समिती आणि लक्ष्मणपुरी येथील सुन्नी वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांना सध्याच्या मंदिराच्या जवळ असलेली मशीद हटवण्याचा आदेश देण्यात यावा.

यापूर्वी मथुरा जिल्हा न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेमध्ये कटरा केशव देव मंदिर परिसरात १७ व्या शतकात ईदशाह बनवण्यात आले आहे. जेथे सध्या मशीद बांधण्यात आली आहे, तेथे महाराज कंस यांचा कारागृह होते आणि तेथेत श्रीकृष्ण मंदिर होते. मोगलांनी ते तोडून तेथे शाही ईदगाह मशीद बनवली.