मानखुर्दच्या मंडल भागातील भंगार गोदामांना प्रचंड आग

अनधिकृत व्यवसाय असल्याने आग लावल्याचा संशय

मानखुर्द येथे लागलेली आग

मुंबई – अनधिकृत रसायनांचा साठा आणि व्यवसाय, लाकडाच्या वखारी, लोखंडाचे कारखाने अन् भंगार सामान आदींचे व्यवसाय असलेल्या १५ एकर परिसरात पसरलेल्या मानखुर्द येथील मंडल परिसरातील गोदामांना ५ फेब्रुवारीला दुपारी अडीच वाजता प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागली. रात्री उशिरापर्यंत ही आग शमली नव्हती. काळ्या धुराचे प्रचंड लोट ४ ते ५ कि.मी.पेक्षाही अधिक परिसरात पसरले होते. संध्याकाळपर्यंत येथील रसायनांचे स्फोट थोड्या थोड्या वेळाने होऊन आगीचे डोंब उसळत होते. रसायनांची पिंपे हवेत उडत होती. ही आग माफियांनी लावल्याचा आरोप होत आहे. ४ वर्षांपूर्वी अशीच भीषण आग लागली होती.

अग्नीशमन दलाच्या ३५ गाड्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होत्या. या आगीत २ जवान किरकोळ घायाळ झाले.

येथे जाणारे रस्ते अरुंद असल्याने गाड्यांना आत जाण्यास अडचण येत होती. त्यामुळे तेथील काही बांधकामे तोडण्यातही आली. शेजारीच मोठी झोपडपट्टी असल्याने आग तिथे पसरण्याचा धोका होता. तेथील नागरिकांना परिसर रिकामा करायला सांगण्यात आले होते. आजूबाजूची अनेक गोदामे जेसीबीच्या साहाय्याने बाजूला केली. १५० गाळे जळून खाक झाले असून प्रत्येकातील १ ते २ कोटीचा माल जळून गेल्याची शक्यता आहे.

घाटकोपर-मानखुर्द लिंक मार्गाला लागून असलेल्या शीव-पनवेल मार्गावरील वाहतूकही या आगीमुळे बाधीत झाली. त्यामुळे चेंबूर किंवा फ्रीवे हे मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर, रेस्क्यू वाहने घटनास्थळी आणण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नाही.

  • येथील अनधिकृत लोखंड बनवण्याच्या व्यवसायासंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना सांगितले होते, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी दिली.
  • ‘मुंबई महापालिका, कचरा माफिया आणि स्क्रॅप माफिया यांची ‘पार्टनरशीप’ आहे’, असा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला आहे.
  • येथे अनधिकृत व्यवसाय नव्हे, तर अनधिकृत साठा होता, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. संबंधित प्रभागांनी यावर कारवाई करायला हवी होती, असेही त्या वेळी म्हणाल्या.