पुण्यात स्थानिकांच्या साहाय्याने गुन्हे करणारी नायजेरियन टोळी अटकेत

नगरच्या सायबर क्राइम पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई

नायजेरियन टोळीचा वेळीच बंदोबस्त करणे उचित ठरेल !

नगर – सामाजिक संकेतस्थळावर मित्र होण्यासाठीची मागणी पाठवून नंतर खरेदीच्या निमित्ताने फसवणूक करणार्‍या एका नायजेरियन टोळीला नगरच्या सायबर क्राइम पोलीस ठाण्याच्या पथकाने पुण्यात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडले. हे आरोपी पुण्यात राहून अशा प्रकारचे गुन्हे करत होते. स्थानिकांच्या साहाय्याने ते गुन्हे करत असल्याचे उघड झाले. आयुर्वेदीय उत्पादनांसाठी कच्चा माल खरेदी करण्याच्या निमित्ताने या टोळीने नगरमधील एका हॉटेलचालकाला अनुमाने १४ लाख रुपयांना फसवले होते. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक केलेल्या ४ आरोपींकडून वेगवेगळ्या ८ अधिकोषांचे एटीएम् कार्ड आणि क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले. आरोपींची ६ वेगवेगळ्या अधिकोषांत खाती असून त्यावर पैसे भरण्यास सांगितले जात असे. त्यांच्याकडून १० भ्रमणभाष, १० सीमकार्ड, लॅपटॉप, बँकांची चेकबूक जप्त करण्यात आली आहेत.