साधकांच्या मनी विराजमान परात्पर गुरु डॉ. आठवले !
१. घरी बसून नामजप करत असतांना प.पू. गुरुदेवांना सूक्ष्मातून घरी येण्याची इच्छा सांगितल्यावर त्यांंनी मी आता आलो आहे, असे सांगणे
४.५.२०१९ या दिवशी सकाळी माझा श्रीकृष्णाचा नामजप गुणात्मक झाला. श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच माझ्याकडून नामजप करवून घेतला. मी घरात आसंदीवर बसून नामजप करत सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांशी बोलत होतो. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वहात होते. मी त्यांना म्हणालो, गुरुदेव, मी २ – ३ वेळा रामनाथी आश्रमात येऊन गेलो. तुमच्याशी प्रत्यक्षात बोललो. आपण माझ्या घरी यावे, अशी माझी इच्छा आहे. तेव्हा ते म्हणाले, मी तर आताही घरी आलो आहे.
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन
२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी गुजरातच्या राजधानीत गुजराती भाषेतून बोलणे : मी लगेच आसंदीतून उठलो आणि त्यांना म्हणालो, आपणच येथे बसावे आणि मार्गदर्शन करावे. मी तुमच्या चरणांशी बसतो. ते लगेच म्हणाले, मी सर्वांनाच मार्गदर्शन करतो. त्यानंतर कर्णावती (गुजरातची राजधानी) येथील सर्व साधक आणि घरातील आम्ही सर्वजण बसलो. गुरुदेवांचा सत्संग आहे; म्हणून गुजराती लोकही आले. ते म्हणाले, मी तुम्हा सर्वांशी गुजरातीतून बोलतो. गुरुदेव गुजराती भाषेत म्हणाले, केम छो, बधा मजामा छो ने ? (कसे आहात ? सर्वजण मजेत आहात ना ?) आणि मला म्हणाले, मी गुजरातीतून बोलू शकतो ना ?
२ अ. श्रद्धा ठेवून भक्ती करा ! : नंतर ते म्हणाले, तुम्ही सर्व जण या गुजरातच्या भूमीत रहात आहात. बाजूलाच सौराष्ट्र आहे. तुमची कृष्णभक्ती आहेे. तुम्ही श्रद्धा ठेवून भक्ती केल्यास तुम्हाला पुष्कळ लाभ होईल आणि सर्व सुखी व्हाल. तुम्ही मनापासून भक्ती करा.
२ आ. परमेश्वर भावाचा भुकेला आहे ! : भगवान श्रीकृष्ण तुमच्या समवेतच आहे, यावर विश्वास ठेवा. देव कुठे नाही ? मराठीत म्हण आहे, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्व ठिकाणी परमेश्वर आहे. परमेश्वर भावाचा भुकेला आहे.
२ इ. आपत्काळात जिवंत रहायचे असेल, तर भक्ती करायला हवी ! : या आपत्काळात भक्तीभावाने त्याचे स्मरण करा. वर्तमानात आणि पुढेही आपत्काळ आ वासून उभा आहे. जिवंत रहायचे असेल, तर भक्ती करायला हवी. तुम्ही मारुति किंवा राधा यांच्यासम भक्ती करा.
सर्वांनाच आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाल्यामुळे पुष्कळ आनंद झाला. त्यानंतर सर्वांनी श्रीकृष्णाचा नामजप केला. मी डोळे उघडले. मी परात्पर गुरु डॉक्टरांना शरण जाऊन श्रद्धेने नमस्कार केला आणि म्हटले, अशीच कृपादृष्टी सर्वांवर ठेवावी.
– श्री. सतीश दातार, कर्णावती, गुजरात. (४.५.२०१९)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |