धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर असे शहरांचे नामकरण करा !

हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे फेरीद्वारे मागणी

फेरीत सहभागी हिंदुराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते

तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २८ जानेवारी (वार्ता.) – उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करावे आणि औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात यावे, या मागण्यांसाठी येथे हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने शहरातून पायी फेरी काढण्यात आली, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी महंत मावजीनाथ महाराज, महंत व्यकंटअरण्य महाराज, संजय सोनवणे, परीक्षित साळुंके, सुदर्शन वाघमारे, गिरीश लोहारेकर, अर्जुन साळुंके, सुधीर परमेश्‍वर, दिनेश पलंगे, जिओत्तम जेवळीकर, शिवराज जाधव, दिनेश धनके आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

यापूर्वीही संघटनेच्या वतीने निवेदन देऊनही सरकारने नोंद न घेतल्यामुळे पुन्हा निवेदन द्यावे लागत आहे, असे हिंदुराष्ट्र सेनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. आता या निवेदनाची नोंद न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने देण्यात आली आहे.