राष्ट्र आणि धर्म प्रेम असलेला युवा साधक जयेश कापशीकर (वय १४ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

‘भारतातील सध्याचे नागरिक आणि त्यांची मुले यांचे बोलणे ऐकले आणि वर्तन पाहिले, तर ‘भारताची पुढे स्थिती काय होईल’, याची काळजी वाटते. जयेश कापशीकर याच्या संदर्भातील लेख वाचल्यावर याच्यासारखी मुलेही भारतात असल्याने भारताची अजिबात काळजी वाटत नाही, उलट भारत जगातील एक श्रेष्ठ देश असेल, याची खात्री पटते. जयेश आणि त्याचे आई-वडील यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कु. जयेश याचा सत्कार करतांना पू. (सौ.) अश्‍विनी पवार

पनवेल – लहान वयापासूनच धर्मप्रेम आणि देशभक्ती यांसह जिज्ञासूवृत्ती असलेला देवद येथील सनातनच्या आश्रमातील युवा साधक कु. जयेश ओंकार कापशीकर (वय १४ वर्षे) याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे २२ जानेवारी २०२१ या दिवशी आश्रमातील फलकाद्वारे घोषित करण्यात आले. या आनंददायी वार्तेनंतर आश्रमातील सनातनच्या पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी कु. जयेश, त्याचे वडील श्री. ओंकार कापशीकर आणि आई ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. भक्ती कापशीकर यांची त्यांच्या खोलीत जाऊन भेट घेतली. या वेळी पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी जयेश याचा सत्कार करून त्याला भेटवस्तू दिली.

लहानपणापासून रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेला कु. जयेश उपजतच हुशार, समजूतदार आणि नम्र आहे. या वेळी आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारी त्याची आई सौ. भक्ती कापशीकर आणि वडील श्री. ओंकार कापशीकर यांचेही पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी भेटून अभिनंदन केले.

सत्कार झाल्यावर आनंदी आणि उत्साही वाटत असल्याचे कु. जयेश याने सांगितले. सत्कारप्रसंगीही कु. जयेश अगदी स्थिर आणि शांत होता. रामनाथी आश्रमात वास्तव्यास असणारे कु. जयेश याचे आजी आणि आजोबा यांना ही वार्ता समजल्यावर त्यांनीही आनंद व्यक्त केला.

कु. जयेशच्या राष्ट्र आणि धर्म प्रेमाची कल्पना करू शकत नाही ! – पू. (सौ.) अश्‍विनी पवार

दळणवळण बंदीच्या काळात समाजातील जयेशच्या वयाची मुले भ्रमणभाष, दूरचित्रवाहिनी यांत वेळ वाया घालवत होती; परंतु जयेशने सेवा करून त्याचा लाभ करून घेतला. देवाने तुम्हाला पुष्कळ गुणी मुलगा दिला आहे. त्यामुळे देवाप्रती आणि तुमच्याप्रती कृतज्ञता. मातृभूमीची सेवा करण्याचे अत्त्युच्च ध्येय बाळगणार्‍या कु. जयेश याच्यातील राष्ट्र आणि धर्म प्रेमाची आपण कल्पना करू शकत नाही.’’

कु. जयेश याची आई सौ. भक्ती कापशीकर म्हणाल्या, ‘‘मला जयेशची काळजी वाटायची; परंतु शाळेतही देवाने त्याच्याभोवती जणू संरक्षककवच निर्माण करून त्याला अयोग्य वातावरणापासून दूर ठेवले. ‘सर्वांनी साधना करण्यासह राष्ट्ररक्षण केले पाहिजे’, असे जयेश नेहमी म्हणतो.’’


कु. जयेशसारखे युवा हिंदु राष्ट्राची धुरा सांभाळतील !

एकदा परीक्षेत ‘ताजमहाल कुणी बांधला ?’ या प्रश्‍नाचे उत्तर लिहितांना प्रखर राष्ट्राभिमानी कु. जयेश याने ‘ताजमहाल शहाजहान याने बांधला नाही’, असे उत्तर लिहिले होते. ‘इतिहासाभिमानी आणि प्रखर राष्ट्र अस्मिता असलेला कु. जयेश याचे अनुभव म्हणजे एक सुंदर आश्‍चर्यच आहे. येणार्‍या हिंदु राष्ट्राची धुरा असेच राष्ट्र आणि धर्माभिमानी युवक सांभाळतील, यात शंका नाही’, असे उद्गार पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी त्याच्या सत्काराच्या वेळी काढले.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक