गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

परात्पर गुरु डॉ. आठवले

सौ. मंगला मराठे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी १९९१ या वर्षी साधनेला आरंभ केला. या साधनाप्रवासात त्यांना वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सान्निध्य आणि मार्गदर्शन यांचा लाभ झाला. परात्पर गुरुमाऊलीच्या समष्टी साधनेसाठी उपयुक्त अवतारी व्यक्तीत्वाचे सारे रेशीमधागे उलगडणारा हा साधनाप्रवास सौ. मंगला मराठे यांनी शब्दबद्ध केला आहे. आपण तो त्यांच्या शब्दांतच अनुभवण्याचा प्रयत्न करूया.

२२ जानेवारी या दिवशी साधिकेने वेळोवेळी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वात्सल्य याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

(भाग १०)

भाग ९ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/443933.html


सौ. मंगला मराठे

१४. सौ. मंगला मराठे यांच्या आई-वडिलांना आध्यात्मिक त्रासातून सोडवून त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

१४ अ. साधिकेला आई-वडिलांचे दायित्व घेण्यास सांगणे  

१४ अ १. मुंबईत रहाणारे साधिकेचे वडील सेवानिवृत्त झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी आई-वडिलांना धामसे येथे घर बांधून रहाण्यास सुचवणे : माझे आई-वडील मुंबईला रहात होते. वडील नोकरीतून निवृत्त झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना गोव्याला आमच्याकडे बोलावण्यास सांगितले. जुन्या संस्कारांमुळे वडील मुलीकडे म्हणजे माझ्याकडे रहाण्यास सिद्ध नव्हते; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘त्यांनी धामसे येथे तुमच्या शेजारी एक लहानसे घर बांधून रहावे’, असे आम्हाला सुचवले. त्यासाठी माझे वडील सहमत झाले. आम्ही तिघी बहिणीच असून आम्हाला भाऊ नाही आणि मी घरात सर्वांत मोठी असल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘आई-वडिलांची सर्व काळजी घेण्याचे दायित्व माझ्यावर सोपवले.

अशा प्रकारे त्यांनी माझ्याकडून आई-वडिलांविषयीचे कर्तव्य पूर्ण करून घेतले’, हे आता माझ्या लक्षात येते.

१४ अ २. आईला पक्षाघाताचा (पॅरालिसिसचा) झटका आल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी परिचारिका करत असलेल्या सर्व सेवा शिकून घेऊन तिची सेवा आणि नामजपादी उपाय करावयास सांगणे, त्यानंतर ३ मासांनी ‘आईशी असलेला देवाण-घेवाण हिशोब संपला असून आता प्रसार करा’, असे सांगणे :
माझे आई-वडील गोव्यात रहायला आल्यावर काही दिवसांनीच आईला पक्षाघाताचा (पॅरालिसिसचा) झटका आला. ती साडेतीन वर्षे अंथरुणावर होती. तिला प्रथम जेव्हा रुग्णालयात ठेवले, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘परिचारिकेचे निरीक्षण करून ती आईची करत असलेली सर्व सेवा शिकून घ्या; कारण पुढे तुम्हाला ती सेवा करायची आहे’, असे सांगितले. मग मी १० दिवसांत त्या सर्व सेवा शिकून घेऊन त्याप्रमाणे करू लागले. त्यांनी मला प्रतिदिन तिच्या डोक्यावर हात ठेवून एक मास दत्त आणि गणपति यांचा नामजप करायला सांगितला. त्यानंतर २ मासांनी त्यांनी आईला सांभाळायला प्रशिक्षित परिचारिका नेमण्यास सांगितले. तिच्यासाठी परिचारिका ठेवल्यावर एका आठवड्याने ते मला म्हणाले, ‘‘तुमचा आईशी असलेला देवाण-घेवाण हिशोब पूर्ण झाला आहे. आता तुम्ही अध्यात्मप्रसाराची सेवा चालू करा.’’

परात्पर गुरु डॉक्टर त्रिकालज्ञानी असल्यामुळे त्यांनी आईशी असलेल्या देवाण-घेवाण हिशोबातून मला मुक्त केले. आई पुढे ३ वर्षे होती.

(त्या वेळी मला कुटुंबातील इतर सदस्यांचे टोमणे, वाद, टीका, विरोध आणि मनस्ताप यांना सामोरे जावे लागले होते. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनीच मला बळ आणि मनोधैर्य दिले. त्यामुळे मी घराबाहेर पडून प्रसारसेवा करू शकले होते.)

१४ अ ३. वडिलांनाही पक्षाघाताचा झटका येणे, त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रसारात सेवा करणार्‍या साधिकेच्या यजमानांना न बोलवता साधिकेलाच वडिलांचीही सेवा करण्यास सांगून वडिलांसमवेतचा देवाण-घेवाण हिशोब संपल्याचे सांगणे :
आईला पक्षाघाताचा झटका झाल्यानंतर पुढे २ – ३ वर्षांनी माझ्या वडिलांनाही पक्षाघाताचा झटका आला. त्या वेळी यजमान उत्तर भारतात अध्यात्मप्रसारासाठी गेले होते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला स्पष्टपणे सांगितले, ‘‘त्यांना बोलावण्याची आवश्यकता नाही. तुम्हीच हे सर्व हाताळा. तुम्हाला जमेल.’’ वडील ३ दिवस बांबोळी येथील रुग्णालयात होते. ते बेशुद्धच होते. माझ्या साहाय्यासाठी एक साधक होता; मात्र तिसर्‍या दिवशी वडिलांचे निधन झाले. त्यानंतरचे सर्व नियोजनही परात्पर गुरु डॉक्टरांनी मलाच करायला लावले. हे सर्व मी प्रथमच करत होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर ‘अशा प्रकारे साधकांना सर्व काही शिकण्याचे आणि करण्याचे प्रशिक्षण त्याच्या नकळत कसे देतात ?’, हे मी अनुभवले.

​हे सर्व झाल्यावर त्यांनी मला ६ मास ३ माळा दत्ताचा नामजप करण्यास सांगितला आणि तो पूर्ण झाल्यावर त्यांनी माझा वडिलांशी असलेला देवाण-घेवाण हिशोब संपल्याचे सांगितले.

१४ आ. परात्पर गुरु डॉक्टर धामसे येथे आईला भेटण्यासाठी येणे आणि तिला ‘आता इथली काळजी करू नका, पुढील प्रवासाला निघा’, असे सांगणे : आई साडेतीन वर्षे अंथरुणावरच होती. वडिलांचे देहावसान झाल्यानंतर आईची प्रकृती अधिकच खालावली. एक दिवस अकस्मात परात्पर गुरु डॉक्टर एका संतांसमवेत आईला भेटण्यासाठी धामसे येथे आले. त्यांनी आईला ‘‘नामजप होतो का ?’’, असे विचारले. ते तिला म्हणाले, ‘‘आता तुमचे इथले सर्व झाले आहे. आता इथली काळजी करू नका. पुढच्या प्रवासाला निघा.’’ तेव्हा आईच्या डोळ्यांतून कृतज्ञतेने अश्रूधारा वाहू लागल्या. तिला बोलता येत नव्हते; म्हणून ती हात जोडत होती. परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘आता त्यांची भावावस्था चालू झाली आहे.’’ त्यानंतर पुढे २ मासांनी (महिन्यांनी) आईचे निधन झाले.

परमदयाळू परात्पर गुरु डॉक्टरांनी तिच्या अंतिम काळात येऊन तिला मुक्त करून आम्हा सर्वांनाच उपकृत केले होते.

१४ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘साधिकेच्या आई-वडिलांना मृत्यूनंतर गती मिळावी’, यासाठी सनातनच्या पुरोहित साधकांकडून श्राद्धपक्ष विधी करवून घेणे : मला भाऊ नसल्याने आई-वडिलांचे महालय श्राद्ध इत्यादी विधी करण्यास अडचण होती. मी मोठी असल्याने यजमानांनी विधी करणे योग्य होते; परंतु ते सतत अध्यात्मप्रसाराच्या निमित्त भारतभर फिरतीवर होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातनच्या पुरोहितांना प्रती वर्षी ही दोन्ही श्राद्धे करण्यास सांगितली. ते पुरोहितांना म्हणाले, ‘‘मंगलाचे आईवडील दोघेही ५० टक्के पातळीच्या जवळपास होते. त्यासाठी त्यांचे श्राद्ध करणे आवश्यक आहे. मंगलाला भाऊ नाही आणि आधुनिक वैद्य मराठे अध्यात्मप्रसारासाठी बाहेर असतात. त्यामुळे आपणच हे श्राद्ध करायचे.’’

१४ ई. एका संतांनी नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राद्ध करायला सांगणे, मराठेंच्या घरात यजमान लहान असूनही परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांनाच ते करायला सांगणे आणि त्याचा लाभ साधिकेच्या आई-वडिलांनाही होणार असल्याने त्यांच्या या सांगण्याचा कार्यकारणभाव नंतर लक्षात येणे : वर्ष २००५ मध्ये एक संत धामसे येथे आले होते. त्यांनी आम्हाला पूर्वजांच्या त्रासाच्या निवारणासाठी नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राद्ध करण्यास सांगितले होते. मराठे यांच्या घरात आम्ही लहान; परंतु ‘आम्ही साधना करत असल्याने आम्हीच ते विधी केल्यास अधिक परिणामकारक होतील’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. त्याप्रमाणे आम्ही त्र्यंबकेश्‍वर येथे जाऊन ते सर्व विधी केले. या विधीच्या वेळी केले जाणारे संकल्प ऐकल्यावर ‘मला भाऊ नसल्याने माझ्या माहेरच्याही ७ पिढ्यांचा उद्धार व्हावा’, यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या यजमानांना हे विधी करण्यास सांगितले होते’, असे माझ्या लक्षात आले.

(क्रमश: उद्याच्या अंकात)

– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०१७)


भाग ११. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/444623.html

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक