वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्याच वेळी अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस यांनीही शपथ घेतली. या शपथविधीनंतर अवघ्या काही घंट्यांत जो बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले अनेक महत्त्वाचे निर्णय रहित केले. बायडेन यांनी घेतलेल्या नव्या निर्णयानुसार पॅरिस हवामान पालटाविषयीच्या करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार आहे. पॅरिस येथे वर्ष २०१५ मध्ये मान्य करण्यात आलेल्या हवामान करारातून माघार घेत असल्याचे वर्ष २०१७ मध्ये ट्रम्प यांनी घोषित केले होते. त्या वेळी त्यांनी ‘नागरिकांच्या संरक्षणासाठीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी अमेरिका ‘पॅरिस करारा’तून बाहेर पडत आहे,’ असे सांगितले होते.
जगातील ५५ टक्के प्रदूषणास कारणीभूत असणार्या ५५ देशांनी स्वाक्षर्या केल्यावर हा करार अस्तित्वात आला. ४८ टक्के प्रदूषण करणार्या अमेरिका, चीन, ब्राझिल आदी ६० देशांनी पहिल्या टप्प्यात या करारावर स्वाक्षर्या केल्या. जगाच्या एकंदर प्रदूषणापैकी ४.१ टक्के प्रदूषण करणार्या भारताने पहिल्या टप्प्यात स्वाक्षरी केली नव्हती. ब्रिटन, युरोपीय युनियन, रशिया आणि इतर अनेक देशांनी हळूहळू या करारामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर वर्ष २०१६ मध्ये भारताने या करारामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
अमेरिका आता इस्लामी आणि आफ्रिकी देशांतील मुसलमानांना प्रवेश देणार
बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर एकूण १७ अध्यादेशांवर स्वाक्षर्या केल्या. यांपैकी जवळजवळ सर्वच निर्णय हे ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले असून ते रहित करण्यात आले आहेत. यामध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणणे, सर्वांसाठी मास्क वापरणे अनिवार्य करणे, अधिकाधिक लोकांना आर्थिक साहाय्य करणे, वर्णद्वेष संपवणे, अमेरिका आणि मॅक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय रहित करण्यासह या प्रकल्पाला पुरवण्यात येणारा निधी थांबवणे, जागतिक आरोग्य संघटनेमध्ये पुन्हा सहभागी होणे, इस्लामी आणि आफ्रिकी देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यास असलेली बंदी उठवणे, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यास सप्टेंबरपर्यंत स्थगिती देणे आदी निर्णयांचा समावेश आहे.