खलिस्तानी आतंकवादी संघटनांशी संबंध असलेल्या ‘खालसा एड’ या संघटनेला शांततेचे नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस !

लंडन (इंग्लंड) – कॅनडामधील टिप उप्पल आणि परबमीत सिंह यांनी ब्रिटनमधील शिखांची संघटना ‘खालसा एड’ हिला शांततेचे नोबल पारितोषित मिळावे, यासाठी शिफारस केली आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘ही संघटना जगभरात आपत्कालीन स्थितीमध्ये साहाय्य पोचवण्याचे काम करते.’ भारतात मात्र या संघटनेवर खलिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करण्याचा आरोप आहे. याविषयी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून या संघटनेची चौकशीही केली जात आहे. या संघटनेचा संबंध ‘सिख फॉर जस्टीस’ या बंदी घातलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेशी आहे. देहलीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला या संघटनेकडून साहाय्य केले जात आहे.

‘खालसा एड’ची स्थापना वर्ष १९९९ मध्ये भारतीय वंशाचे रविंदर सिंह यांनी कोसोवोमध्ये शरणार्थींची स्थिती पाहून त्यांच्या साहाय्यासाठी केली होती. ही संघटना ब्रिटन, भारत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये सक्रीय आहे.