कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटिसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम रहातील, अशी सूचना केली आहे. याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्या वेळी घेतले, त्या वेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आवश्यकता भासल्यास त्यांच्या सल्ल्याने आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. कोरोनाचे कारण पुढे करत सत्ताधारी राजकारण करत आहेत, असा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केला.
राजन तेली म्हणाले, ‘‘राज्य सरकारने ३ वेळा दिलेल्या मुदतवाढीच्या काळातच विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी विविध प्रलोभने जिल्हा बँकेच्या माध्यमातून दाखवली आहेत. मतदारांच्या शंभरहून अधिक नातेवाइकांना तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी दिली आहे.’’