सौ. मंगला मराठे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी १९९१ या वर्षी साधनेला आरंभ केला. या साधनाप्रवासात त्यांना वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सान्निध्य आणि मार्गदर्शन यांचा लाभ झाला. ‘परात्पर गुरुदेवांच्या प्रथम भेटीतच त्यांची लागलेली ओढ, सतत सहजावस्थेत राहून स्वतःचे वेगळेपण जाणवू न देणारे परात्पर गुरुदेवांचे आगळे वेगळे व्यक्तीमत्त्व, त्यांची शिकवण्याची अनोखी पद्धत; साधक, कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक यांचे त्रास दूर करणारे त्यांचे प्रेम, त्यांच्या प्रीतीवर्षावाची अनुभवलेली व्यापकता, साधकांचे त्रास दूर करून अन् वेळप्रसंगी स्वतः सहन करून त्यांचे सर्वार्थाने रक्षण करणार्या प्रेमळ गुरुमाऊलीचे वात्सल्य आणि या सगळ्यातून अनुभवलेले अध्यात्मशास्त्रातील एक महान शास्त्रज्ञाचे अष्टपैलूत्व’, असे हे परात्पर गुरुमाऊलीच्या समष्टी साधनेसाठी उपयुक्त अवतारी व्यक्तीत्वाचे सारे रेशीमधागे उलगडणारा हा साधनाप्रवास सौ. मंगला मराठे यांनी शब्दबद्ध केला आहे. आपण तो त्यांच्या शब्दांतच अनुभवण्याचा प्रयत्न करूया.
(भाग १)
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली प्रथम भेट !
१ अ. यजमानांना (आधुनिक वैद्य मराठे यांना) त्यांचे वर्गमित्र श्री. प्रकाश जोशी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अध्यात्मविषयक अभ्यासवर्गासाठी बोलावणे; परंतु साधिकेच्या मनात अध्यात्माविषयी असलेल्या अपसमजामुळे त्यांनी यजमानांना न जाण्यास सांगणे : ‘वर्ष १९९१ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले हे पणजी, गोवा येथे अध्यात्माचा अभ्यासवर्ग घेण्यासाठी येणार होते. त्या वेळी माझ्या यजमानांचे, म्हणजे आधुनिक वैद्य मराठे यांचे वर्गमित्र श्री. प्रकाश जोशी आम्हाला अध्यात्माच्या अभ्यासवर्गाला येण्याविषयी बोलावण्यास आले होते; परंतु सर्वसामान्यांच्या मनात जसे अध्यात्माविषयी अपसमज आणि पूर्वग्रह असतात, तसे माझेही असल्यामुळे मी यजमानांना अभ्यासवर्गाला जाण्यास संपूर्णतः विरोध केला.
१ आ. श्री. जोशी यांनी यजमानांच्या मित्रांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एका अभ्यासवर्गाचे नियोजन करणे, त्या वेळी ‘या अभ्यासवर्गामुळे यजमान साधूसंत होऊन आपल्याला सोडून जातील’, अशी भीती वाटणे : तेव्हा श्री. जोशी यजमानांना म्हणाले, ‘‘डॉक्टर, तुमचे पुष्कळ मित्र डॉक्टर आहेत. त्यांच्यासाठी एक अभ्यासवर्ग आयोजित करण्यासाठी मला साहाय्य करा.’’ तेव्हा आम्ही ‘जेयसी क्लब’ आणि ‘आय्.एम्.ए. (इंडियन मेडिकल असोशिएशन)’ यांच्या कार्यात सक्रीय सहभागी होत होतो. त्यामुळे या प्रस्तावाला मी लगेच सहमती दर्शवली. तेव्हा श्री. प्रकाश जोशी यांनी ‘अभ्यासवर्ग कसा असतो ?’, हे पहाण्यासाठी पणजी येथे येण्यास यजमानांचे मन वळवले. मला मात्र या अभ्यासवर्गाला जाण्याचे धाडस होत नव्हते. ‘यजमान तिथे गेल्यावर साधूसंत होऊन आम्हाला सोडून जातील’, असे मला वाटत होते; म्हणून मी त्यांना अभ्यासवर्गाला पाठवण्यास सिद्ध नव्हते. तेव्हा यजमान मला म्हणाले, ‘‘तू आधी सभागृहात जा, ऐक आणि तुला आवडले, तरच मला सभागृहात बोलव.’’ या अटीवर आम्हा उभयतांचे त्या अभ्यासवर्गाला जायचे निश्चित झाले.
१ इ. श्री. जोशी यांनी अभ्यासवर्गासाठी घेतलेल्या सभागृहाच्या पूर्वसिद्धतेसाठी बोलावल्यामुळे तेथे जाणे आणि तेथे पूर्वसिद्धता करतांना वेगळेपणा जाणवणे : अभ्यासवर्ग घ्यायचे निश्चित झाल्यावर श्री. जोशींनी आम्हाला निरोप पाठवला, ‘काही जण अभ्यासवर्गाच्या एक दिवस आधी पणजीला सभागृहाच्या सिद्धतेसाठी येणार आहेत. तुम्हीही साहाय्यासाठी तेथे येऊ शकता का ?’ तेव्हा मी पणजीला अधिकोषात कार्यरत होते आणि शनिवारी मला अर्धा दिवस सुट्टी असल्याने आम्ही दोघेही (मी आणि यजमान) सायंकाळी सभागृहात गेलो. त्या वेळी ‘सेवा’ ही संकल्पनाच आम्हाला ज्ञात नव्हती. श्री. जोशी यांनी आम्हाला साहाय्यासाठी बोलावले होते; म्हणून केवळ आम्ही गेलो होतो. तेथे गेल्यावर आम्ही इतरांसमवेत आसंद्या पुसणे, स्वच्छता करणे, केर काढणे इत्यादी कामे केली. ही सर्व कामे करूनही आम्हाला थोडाही थकवा आला नाही. त्या वेळी आम्हाला ‘यात काहीतरी वेगळेपण आहे’, असे जाणवत होते; परंतु ‘यात वेगळे काय आहे ?’, हे तेव्हा आम्हाला कळले नाही.
१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटायची इच्छा नसणे, तरीही श्री. जोशींनी सांगितल्यामुळे त्यांना भेटणे, तेव्हा त्यांचे अतिशय साधे रहाणे पाहून ‘ते ७ वर्षे विदेशात राहिले आहेत’, यावर विश्वासच न बसणे : सभागृहातील सर्व कामे करून झाल्यावर श्री. जोशी आम्हाला म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले मुंबईहून गोव्याला आले आहेत. आपण त्यांना भेटूया.’’ त्यांना भेटायचे माझ्या मनात नव्हते; परंतु केवळ श्री. जोशींनी सांगितल्यामुळे आम्ही त्यांना भेटायला गेलो. मला वाटले, ‘इंग्लंडमध्ये बरीच वर्षे राहून आलेले हे डॉक्टर ‘सुटाबुटात’ आणि फाडफाड इंग्रजी बोलणारे असणार; परंतु प्रत्यक्षात साधा ‘शर्ट-पँट’ घातलेले अत्यंत साधे, मोठेपणा नसलेले, प्रेमळ आणि स्मितहास्य करणारे डॉक्टर खोलीतून बाहेर आले. तेव्हा ‘हे ७ वर्षे विदेशात राहून आले आहेत’ यावर माझा विश्वासच बसत नव्हता. हसत-हसतच त्यांनी आम्हा सर्वांचे स्वागत केले.
१ उ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रेमळ दर्शनानंतर त्यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्याकडे खेचले जाणे आणि त्यांच्याशी ‘पुष्कळ जुनी ओळख आहे’, असे वाटणे : त्यांचे इंग्रजी बोलणेही अगदी मराठी बोलल्याप्रमाणे अतिशय साधे होते. ‘चुंबकाकडे लोखंड आकर्षित व्हावे, तशी मी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याकडे खेचली जात आहे’, असे मला जाणवत होते. आमच्या पहिल्या भेटीतच जणू ‘आमची त्यांच्याशी पुष्कळ जुनी ओळख आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी ‘त्यांच्यातील चैतन्यामुळे असे वाटत आहे’, हे तेव्हा मला कळले नाही; कारण (चैतन्य जाणवणे वगैरे) हा विषय माझ्यासाठी नवीनच होता.
१ ऊ. कुणीही काहीही सांगितले नसतांना शास्त्रानुसार परात्पर गुरूंच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार करणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी आशीर्वाद देऊन कुलदेवतेचे नामस्मरण करण्यास सांगणे : श्री. जोशींनी आमची त्यांच्याशी ओळख करून दिल्यावर आम्ही उभयतांनी आम्हाला कुणीही सांगितलेले नसतांनाही नकळत त्यांच्या पायावर डोके ठेवून, म्हणजे गुरुकृपायोगानुसार शास्त्राप्रमाणे नमस्कार केला. यापूर्वी मी असा नमस्कार कधीच कुणालाही केला नव्हता. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि कुलदेवतेचे नामस्मरण करण्यास सांगितले.
२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या वाणीतील चैतन्याची आलेली अनुभूती !
२ अ. ‘संतांचा संकल्प किंवा त्यांच्या वाणीतील चैतन्य’ यांविषयी अनभिज्ञ असूनही परात्पर गुरु डॉक्टरांनी कुलदेवतेचे नामस्मरण करण्यास सांगितल्यावर ते ३ दिवस अखंड चालू असल्याची अनुभूती येणे : मला अध्यात्माविषयी काहीही ठाऊक नव्हते; उलट त्याविषयी माझ्या मनात अपसमजच अधिक होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला कुलदेवतेचे नामस्मरण करायला सांगितल्यावर मला ‘आपण कुलदेवतेचे नामस्मरण करावे’, असे वाटले. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी कृतीत आणतांना माझ्या मनात एकदाही एकही प्रश्न निर्माण झाला नाही. त्यांनी सांगितलेल्या क्षणापासूनच आम्ही दोघेही ते सांगतील, तसे करत गेलो. या आधी मी केवळ ‘रामरक्षा स्तोत्रपठण करणे किंवा मंदिरात जाणे’, एवढेच देवाचे करत होते. मला ‘नामस्मरण करणे’ ठाऊकच नव्हते, तरीही परात्पर गुरु डॉक्टरांनी कुलदेवतेचे नामस्मरण करण्यास सांगितल्यानंतर सलग ३ दिवस माझे नामस्मरण अखंड चालू होते. ‘संत म्हणजे कोण असतात ? ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प होणे’, म्हणजे काय असते ? परात्पर गुरु डॉक्टरांच्या वाणीतील चैतन्याचा काय परिणाम होतो ? अनुभूती म्हणजे काय ? त्यामागील शास्त्र काय आहे ?’ या साधनेतील सूत्रांविषयी मला तेव्हा काहीच ठाऊक नव्हते; मात्र मी हे प्रत्यक्ष अनुभवत होते. मला प्रथम अनुभूती आल्या आणि मग माझी साधना चालू झाली.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/441172.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |