म्हापसा, गोवा येथील कु. आरती सुतार यांचे छायाचित्र पाहिल्यावर त्यामध्ये जिवंतपणा जाणवतो, यासंदर्भातील आध्यात्मिक कारणमीमांसा

‘या छायाचित्रात साधिकेचे ओठ हलतात, डोळ्यांत भाव दिसतो, आजूबाजूने पाहिले की, चेहरा वळलेला दिसतो. त्यामुळे त्या त्या बाजूचा कान लहान होतो’, असे जाणवते. यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा पाहूया.

कु. आरती सुतार

१. छायाचित्रामध्ये जिवंतपणा जाणवणे

छायाचित्रामध्ये जिवंतपणा जाणवणे, म्हणजेच त्या छायाचित्रातील व्यक्तीतील भाव आणि चैतन्य या आध्यात्मिक गुणांच्या समुच्चयातून ती स्पंदने त्या व्यक्तीच्या छायाचित्रामध्ये उतरतात.

२. डोळे, कान, मान आणि खांदे हलतांना जाणवणे

छायाचित्रातील केवळ बाह्यमंडल वायुतत्त्वाच्या स्तरावर भावाने भारीत झालेले असते; म्हणूनच या स्थितीत एखाद्या चित्रातील डोळे, कान, मान आणि खांदे हलतांना जाणवतात. छायाचित्रातील ही हालचाल सर्वस्वी त्या छायाचित्रातील व्यक्तीतील कार्यरत गुणांवर अवलंबून असते.

कु. आरती यांच्यातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती असणार्‍या भावामुळे छायाचित्रातील ओठ हलतात आणि डोळ्यांत भाव जाणवतो.

३. तोंडवळा, त्यानंतर खांदे, शरीर आणि पाऊले या क्रमाने अवयव दिशा पालटतांना दिसणे

प्रथम तेजतत्त्वाच्या स्तरावर कार्याची आवश्यकता असल्यास चित्रात जिवंतपणा येतांना आधी तो डोळ्यांमध्ये येत जातो; कारण तेजाला प्रतिसाद देतांना डोळे सर्वाधिक प्रमाणात तेज ग्रहण आणि प्रक्षेपण करू शकतात. तद्नंतर त्या त्या तत्त्वाच्या संयोगाने, म्हणजेच पृथ्वीतत्त्वाच्या संयोगाने वायुतत्त्वाचे कार्य आरंभ झाले. कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे पंचतत्त्वांपैकी कोणत्या तत्त्वाचा संयोग वायुतत्त्वाशी होईल, त्यानुसार चित्रातील कोणता अवयव जिवंत होतो, हे ठरते. त्यामुळे चित्रात पालट होतांना प्रथम डोळे, नंतर चेहरा, त्यानंतर खांदे, शरीर आणि पाऊले या क्रमाने अवयव दिशा पालटतांना दिसतात.

‘त्यामुळे कु. आरती यांचे चित्र आजूबाजूने पाहिले की, चेहरा वळलेला दिसतो. त्यामुळे त्या त्या बाजूचा कान लहान होतो’, असे जाणवते.’

४. छायाचित्रातील विविध अवयवांमध्ये जिवंतपणा जाणवणे

काही साधकांची छायाचित्रे पाहिल्यावर ‘ती छायाचित्रे नसून प्रत्यक्ष साधक आहे’, असे जाणवते. ‘साधकाचे छायाचित्र सजीव झाल्याचे जाणवण्यामागे पुढील सूत्रे कारणीभूत आहेत.

४ अ. छायाचित्रातील अवयवांमध्ये जिवंतपणा आल्यामुळे त्यांची हालचाल जाणवणे, अवयवांमध्ये जिवंतपणा येण्यासाठी कार्यरत झालेले पंचतत्त्व आणि छायाचित्रामध्ये जिवंतपणा येण्यासाठी आवश्यक असणारे भाव आणि चैतन्य यांचे प्रमाण

छायाचित्रातील अवयवांमध्ये जिवंतपणा आल्यामुळे त्यांची हालचाल जाणवणे

टीप – खांद्यांमधील वायूतत्त्वामुळे त्यांची हालचाल जलद गतीने होते.

४ आ. साधिकेचा भाव आणि चैतन्य यांमध्ये वृद्धी झाल्याने टप्प्याटप्प्याने कान, मान, खांदे, शरीर आणि पाऊल यांमध्ये जिवंतपणा वाढून त्यांची हालचाल होतांना दिसणे : ‘कु. आरतीमध्ये असलेला भाव आणि चैतन्य यांमुळे तिचे छायाचित्र पहातांना त्यांमध्ये जिवंतपणा जाणवतो. जेव्हा छायाचित्रामध्ये ५ टक्के भाव आणि चैतन्य असते, तेव्हा प्रथम व्यक्तीचे डोळे हलतांना दिसतात. त्यानंतर भाव आणि चैतन्य यांमध्ये वृद्धी झाल्याने टप्प्याटप्प्याने कान, मान, खांदे, शरीर आणि पाऊल यांमध्ये जिवंतपणा वाढून त्यांची हालचाल होतांना दिसते. यालाच ‘छायाचित्र सजीव आणि बोलके वाटणे’, असे म्हणतात. व्यक्तीतील ईश्‍वराप्रती असणारा भाव आणि साधनेमुळे प्राप्त झालेले चैतन्य यांमुळे केवळ तिचे छायाचित्रच नव्हे, तर तिचे नाव आणि अस्तित्व यांतील पृथ्वीतत्त्वयुक्त जडत्व न्यून होऊन चैतन्यरूपी तेज आणि वायू या तत्त्वांची वृद्धी होते. त्यामुळे व्यक्तीच्या छायाचित्रासह तिचे नाव आणि अस्तित्वही अधिक बोलके आणि सजीव वाटू लागते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.८.२०२० रात्री १०.४०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्याविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक