तुमकुरू येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्माचे आगमन झाल्यानंतर तिच्या भक्तांनी सनातनविषयी काढलेले गौरवोद्गार आणि साधकांना आलेल्या अनुभूती

मंगळुरू येथील सेवाकेंद्रात तुमकुरू येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्माचे आगमन झाल्यानंतर तिचे भक्त श्री. पवनकुमार यजमान यांनी सनातनविषयी काढलेले गौरवोद्गार आणि साधकांना आलेल्या अनुभूती

श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवी

मंगळुरु (कर्नाटक) – १४ डिसेंबर २०२० या शुभदिनी दुपारी ४.१० वाजता मंगळुरू येथील सेवाकेंद्रात तुमकुरू (कर्नाटक) येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे दिव्य आगमन झाले. या वेळी देवीसह धर्मदर्शी श्री. लक्ष्मीश, अर्चक श्री. सिद्धेश शास्त्री आणि भक्त श्री. पवन कुमार यजमान यांचेही आगमन झाले. हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी देवीला पुष्पहार अर्पण करून, तसेच औक्षण करून आश्रमात स्वागत केले. सनातनचे संत पू. विनायक कर्वे आणि पू. रमानंद गौडा यांनी बिल्वार्चना करून देवीचे पूजन केले. देवीसमवेत आलेल्या मान्यवरांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्र मोगेर यांनी सेवाकेंद्रात चालू असलेल्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याची माहिती दिली.

१. वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

अ. देवीसह आश्रमात येत असतांना वाटेत भक्तांना २ गायी आणि गरुड दिसला. ‘त्यांनी आम्हाला आश्रमाच्या मार्गावर आणून सोडले’, असे श्री. पवनगुरुजी म्हणाले.

आ. देवी आश्रमात आल्यानंतर वाहनातून मूर्ती आश्रमात आणतांना एक फूल देवीच्या माथ्यावरून खाली पडले. हा शुभसंकेत आहे.

. श्री. पवन यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संकल्प करून प्रार्थना केल्यावर देवीच्या मुकुटावर असलेल्या नागाच्या फण्यावरील एक मणी हलू लागला आणि त्याच वेळी देवीच्या मुकुटावरून एक फूल प्रसादरूपाने खाली पडले.

ई. सगळ्या साधकांनी मास्क घातलेला पाहून श्री. पवनकुमार म्हणाले, ‘‘तुम्ही कोरोनाच्या संदर्भात सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत आहात.’’

देवीची आरती करतांना डावीकडून पू. रमानंद गौडा, पू. विनायक कर्वे आणि श्री. पवनकुमार

२. देवी आश्रमात आल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती

अ. ‘मी घरी सकाळी धूप दाखवत होते. ते पाहून (बालसंत) पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘देवी येणार आहे. ती फुलांवर बसली आहे. तिला नमस्कार करूया.’’ यावरून ‘पू. भार्गवराम यांना देवीतत्त्वाची अनुभूती आधीपासून येेत होती’, असे वाटले.’ – सौ. भवानी प्रभु (सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांची आई)

आ. ‘देवी आश्रमात येण्याच्या आदल्या दिवशी आश्रमाची स्वच्छता-सेवा करतांना मला शारीरिक त्रास असूनही दुखण्याची जाणीव होत नव्हती. गुरुदेवच माझ्याकडून स्वच्छतेची सेवा करून घेत असल्याचे जाणवत होते. ‘साक्षात् गुरुदेवच देवीसमवेत आले आहेत आणि सभागृहातील संतांसमवेत ते बसले आहेत’, असे मला वाटले. पूजेच्या वेळी ‘देवी आम्हा सर्व साधकांना शक्ती प्रदान करत आहे’, असे जाणवले.’ – श्री. विजय हुळिपल्लेद

इ. ‘देवीच्या आगमनाची सेवा करत असतांना ‘ही सेवा करणे मला शक्य नाही. तुम्हीच करवून घ्या’, अशी शरणागती अनुभवली. ‘गुरुदेवच सेवेसंदर्भातील विचार सुचवत आहेत’, हे मला अनुभवता आले. संगणकीय सेवा करतांना गुरुदेवांचे भावचित्र दिसत होते.’ – श्री. सुमन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी परिशुद्ध ठेवलेली सनातन संस्था !

‘सनातन संस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्याही प्रकारे राजकारणाशी जोडलेली नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या संस्थेला परिशुद्ध ठेवले आहे. त्यामुळे ही संस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात वृद्धींगत झाली आहे. त्यांनी केलेले आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे सनातन संस्थेच्या अन्नछत्रात कोणताही जातीभेद केलेला नाही. त्यांच्या संकल्पाप्रमाणे वर्ष २०२३ ला हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. आम्ही देखील हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची वाट पहात आहोत’, असे देवीभक्त श्री. पवनकुमार यजमान यांनी सांगितले.

सनातनच्या ३ गुरूंची महती !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले या एकट्या व्यक्तीने आरंभलेली ही संस्था आज सहस्रो साधकांना साधना शिकवत आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोन्ही सद्गुरु श्री राजराजेश्‍वरी देवीप्रमाणे सनातनच्या श्री लक्ष्मी अन् श्री सरस्वतीच आहेत.

देवीचे भक्त श्री. पवनकुमार यजमान यांनी सेवाकेंद्र पहातांना काढलेले गौरवोद्गार !

अ. सर्व साधकांना दर्शनाचा लाभ होण्यासाठी देवी स्वतः आश्रमात आली !

श्री. पवनकुमार यजमान साधकांना म्हणाले की, कोरोनामुळे समाजात एकीकडे त्रासदायक वाटत असले, तरी त्या कालावधीत सामाजिक अन्याय-अत्याचार न्यून झाला आहे. कौटुंबिक बांधीलकी वाढली आहे. लोकांनी सात्त्विक आहार ग्रहण करण्यास प्रारंभ केला आहे. याचा अर्थ समाजात अन्याय-अत्याचार वाढले असता भगवंतच कोणत्यातरी एका माध्यमातून त्याची लीला दाखवतो. देवीही रजत महोत्सवानंतर प्रथमच भ्रमणासाठी बाहेर पडून आज सनातनच्या आश्रमात तिचे आगमन झाले आहे. सामान्यतः भक्त देवस्थानात येऊन श्री देवीमातेचे दर्शन घेतात; परंतु आज सनातनच्या साधकांसाठी देवी स्वतःच येथे येऊन दर्शन देत आहे. याचे कारण असे की, देवस्थानात केवळ एक अथवा दोन साधकच येऊ शकतात; परंतु देवीच सेवाकेंद्रात आली, तर सेवाकेंद्रातील सर्व साधकांना देवीच्या दर्शनाचा लाभ होतो आणि देवीचा आशीर्वादही प्राप्त होतो. त्याच उद्देशाने देवीचे आश्रमात आगमन झाले आहे.

आ. श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील अभिन्नतेची श्री. पवनगुरुजी यांना आलेली अनुभूती !

येथे गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले) उभ्या रूपातील चित्र आहे. ते पहातांना मला त्यात ध्यानमंदिरातील श्रीकृष्णाचे उभे चित्र दिसत होते. याचा अर्थ म्हणजे श्रीकृष्ण आणि गुरुदेव हे भिन्न नसून ते एकच आहेत. गुरुदेवांच्या चित्रांत वेगवेगळे हावभाव जाणवतात.

तुमच्या गुरुदेवांविषयी जितके ऐकतो, तेवढी त्यांना पहाण्याची उत्सुकता आणि तळमळ वाढत आहे. ते भवरोगरक्षक आहेत. ‘साधकांचे सर्व त्रास ते स्वतःवर घेतात’, असे मला वाटते.

इ. धर्मप्रसार हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जोपासलेला आणि वाढवलेला वृक्ष

आम्ही दुपारी ३ वाजता होणारा तुमचा ‘ऑनलाईन’ सत्संग पहातो. यामुळे समाजातील लोकांना चांगली माहिती मिळत आहे. प्रत्यक्ष धर्मप्रसाराची संधी गेल्या काही मासांत मिळाली नसली, तरी ऑनलाईनमुळे अधिक लाभ झाला, याचा आम्हाला पुष्कळ आनंद झाला. हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जोपासून वाढवलेला वृक्ष आहे, तो आता फळे देत आहे. सनातनच्या ग्रंथनिर्मितीमुळे आज लोकांपर्यंत हिंदु धर्माचे ज्ञान पोचत आहे. तुमचे कार्य अद्भुत आहे.

ई. धर्मप्रसार करणार्‍या साधकांना पाहून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्याप्रमाणे वाटते !

सर्व साधक आज हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय ठेवून प्रतिदिन धर्मप्रचार करत आहेत. तुम्हा सर्वांना पहाताच छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्यासारखे वाटत आहे. आम्ही दूरभाषवर बोलतांना एकदा तरी ‘हॅलो’ या शब्दाचा वापर करतो; परंतु सनातनच्या साधकांना कधीही दूरभाष केला, तरी अतिशय नम्रपणे ‘नमस्कार’ असे म्हणतात. यास कोणत्याही साधकाचा अपवाद नाही. सर्वांचे वर्तन एकाच रितीचे नम्रतेचे असते. आम्हाला तुमचे आचरण पाहून पुष्कळ शिकायचे आहे.

उ. गुरूंच्या शिकवणीमुळे विद्यावंत होऊनही निगर्वी असलेले सनातनचे साधक !

साधकांनी केलेला त्याग सुलभ नाही. त्यासाठी अनेक जन्मांची साधना लागते. तुमच्यासारखे सर्वांसमोर चुका लिहिणे, इतरांना सांगणे, इतरांची क्षमायाचना करणे, हा सामान्य विषय नाही. तुमचा हा दंड (प्रायश्‍चित्त) ज्ञानवृद्धी करणारा आहे. असे करणे इतरांना शक्य नाही. साधकांना हे सर्व समजल्यामुळे साधक विद्यावंत झाले आहेत; परंतु तुमच्यात गर्व नाही. हे सर्व कसे जमले ? हे म्हणजे तुमच्या गुरूंची इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती यांमुळेच शक्य झाले आहे. सर्व साधक एकसारखेच आहेत, असा त्याग करून येणे सर्वांना शक्य नाही.

ऊ. चैतन्याची जाणीव करून देणारे सेवाकेंद्रातील ध्यानमंदिर !

ध्यानमंदिरातील देवतांची चित्रे पाहून चैतन्याची जाणीव होते. पूजेत अर्पण केलेल्या फुलांची रचनाही आदर्श असून सात्त्विक स्पंदनांनी भारित झालेली आहे. या सात्त्विक रचनेमुळे मला येथे उपस्थित साधकांच्या वस्त्रांतही सात्त्विक तरंगांची जाणीव होत आहे. ध्यानमंदिरात मला उष्णतेची जाणीव होत आहे. हे वातावरणामुळे नव्हे, तर या ठिकाणी असलेल्या देवतांच्या चैतन्यामुळे झाले आहे. तुमचे अष्टदेवतांचे सात्त्विक चित्र आम्हाला द्या. देवस्थानात ते ठेवून आम्ही त्याचे पूजन करू आणि तिथे येणार्‍या भाविकांचे सात्त्विक चित्रांविषयी प्रबोधन करू.

ए. सनातनप्रमाणे आदर्श व्यवस्था करणे कुणालाही शक्य नाही !

सेवाकेंद्रातील सर्व कक्षांचे व्यवस्थापन एका वेगळ्याच लोकाचा अनुभव देते; परंतु समाजाला त्याची कल्पनाही नाही. परात्पर गुरुदेवांनी प्रत्येक ठिकाणी सात्त्विकता निर्माण व्हावी, या विचाराने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला आहे. अशी आदर्श व्यवस्था करणे इतर कुणालाही शक्य नाही. खरोखरच परात्पर गुरु डॉ. आठवले साक्षात् श्री विष्णुच आहेत. येथे आल्यावर वेळ किती आणि कसा गेला, हेही लक्षात आले नाही. ‘संस्थेचे कार्य उत्तरोत्तर वाढू दे’, हीच देवीच्या चरणी प्रार्थना !

ऐ. ‘सनातन प्रभात’च्या सात्त्विक सादरीकरणाविषयी जिज्ञासेने जाणून घेणारे श्री. पवनगुरुजी !

‘सनातन प्रभात’ची माहिती दिल्यावर श्री. पवनगुरुजी म्हणाले, ‘‘हे नियतकालिक हातात धरल्यावर लगेच वेगळीच स्पंदने जाणवतात. ‘नियतकालिकांत अशाच रंगांचा उपयोग करायचा’, हे तुम्हाला कसे समजते ? तुम्ही नियतकालिकात उत्तम शब्दांचा वापर करता. ते सर्व तुम्हाला कसे सुचते ?’’ या वेळी कन्नड ‘सनातन प्रभात’ची सेवा करणारे साधक श्री. प्रशांत हरिहर यांनी सांगितले, ‘‘आम्हाला गुरुदेवांनी स्पंदनशास्त्रानुसार कोणत्या रंगांचा उपयोग करायचा ? सात्त्विक अक्षरे कशी निवडावीत ? सात्त्विक रचना कशी करावी ? आदी सर्वच शिकवले आहे. हे सर्व गुरुदेवांच्या कृपेनेच साध्य होते.’’

हे ऐकून श्री. पवनगुरुजी यांना पुष्कळ आनंद झाला. ‘सनातन प्रभात’च्या कार्याचे कौतुक करून पुढील वर्षी देवीच्या उत्सवाच्या दिवशी श्री. प्रशांत हरिहर यांना ‘सर्वश्री विद्याभूषण पुरस्कार’ देणार असल्याचे त्यांनी घोषित केले.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक