मुंबई – ६ जानेवारी या दिवशी राज्य मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर एका निर्णयाच्या माहितीत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय ट्विटरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. त्यास काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप घेत महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमात शहरांच्या नामांतराचा अजेंडा नाही, अशी भूमिका घेतली होती; पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जानेवारी या दिवशी शासकीय ट्विटरवर पुन्हा संभाजीनगर असा उल्लेख करत काँग्रेसच्या विरोधास आपण जुमानत नाही, हे दाखवून दिले आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याला आघाडी सरकारमधील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी विरोध दर्शवला आहे, तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचाही संभाजीनगरच्या नामांतराला विरोध आहे. त्यानंतरही मुख्यमंत्री कार्यालयाकडून काँग्रेससह या नेत्यांच्या विरोधाला न जुमानता संभाजीनगर या नावाचाच वापर केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ ट्वीट केले होते. त्यात ते म्हणतात की, संभाजीनगरसारख्या मराठवाड्याच्या राजधानीच्या शहरातील सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे. यापुढेही असे जनहिताचे निर्णय घेण्यात येतील.