धर्माचा अधिकार जगण्याच्या अधिकारापेक्षा मोठा नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

प्राचीन श्रीरंगम् मंदिरात उत्सव आणि धार्मिक अनुष्ठान यांच्या आयोजनाच्या संदर्भातील याचिकेवर न्यायालयाचे स्पष्टीकरण !

काही नियमावलींचे पालन करायला सांगून आता देशभरातील मंदिरे भक्तांसाठी उघडली जात आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात काही नियम आणि अटी घालून प्राचीन श्रीरंगम् मंदिरातील उत्सव चालू करण्यासाठी तमिळनाडूतील अण्णाद्रमुक सरकारने प्रयत्न करायला हवेत. सरकार अशी पावले उचलत नसल्यास न्यायालयाने तसे निर्देश सरकारला द्यावेत, अशी भाविकांची अपेक्षा आहे !

चेन्नई (तमिळनाडू) – धार्मिक संस्कार हे सार्वजनिक हित आणि माणसाच्या जगण्याच्या अधिकार यांच्या अधीन असले पाहिजेत. धर्माचा अधिकार जगण्याच्या अधिकारापेक्षा मोठा नाही. या पार्श्‍वभूमीवर कोरोना संकटाच्या काळात सरकारकडून काही उपाययोजना राबवल्या जात असतील, तर त्यात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना स्पष्ट केले.

१. ‘प्राचीन श्रीरंगम् मंदिरात उत्सव आणि धार्मिक अनुष्ठान यांचे नियमित पद्धतीने आयोजन करण्याची अनुमती द्यावी’, असे निर्देश उच्च न्यायालयाने शासनाच्या संबंधित विभागांना द्यावेत’, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका रंगराजन् नरसिंहन् यांनी प्रविष्ट केली होती.

२. यावर न्यायालयाने ‘तिरुचनापल्ली जिल्ह्यात असलेल्या श्रीरंगम् रंगनाथस्वामी मंदिरात कोरोना संकटातील नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे यांचे पालन करून उत्सव आणि धार्मिक अनुष्ठान यांचे आयोजन शक्य आहे का ?, याची पडताळणी राज्य सरकारने करावी’, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले.