राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे आठ रुग्ण

अनुमाने ३ कोटी लोकांना लस मिळण्याची शक्यता

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे सध्या आठ रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध चालू आहे. लसीकरणासाठी सूची काढण्याचा आदेश जिल्ह्यांना दिला आहे. यामध्ये मुख्यत्वे आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा कर्मचारी आणि इतर यांचा समावेश असेल. अनुमाने तीन कोटी लोकांना लस मिळेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नव्या प्रकाराची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी कुणीही अद्याप ‘पॉझिटिव्ह’ नाही, असे त्यांनी सांगितले.

राजेश टोपे पुढे म्हणाले की,…

. महाराष्ट्रात सध्या दिवसाला दोन ते अडीच सहस्र कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. आधी दिवसाला २१ सहस्रांपर्यंत रुग्ण सापडत होते. आता मृत्यूदरही अल्प झाला आहे.

२. कोरोना विषाणूचा हा नवा प्रकार अधिक संसर्गजन्य आहे. ७० टक्के अधिक झपाट्याने त्याचा संसर्ग होऊ शकतो.

३. आपण इतर राज्यांनीही ब्रिटनमधून येणार्‍या प्रवाशांविषयी नियमावली सिद्ध करण्याविषयी केंद्राला सांगणार आहोत. म्हणजे ते रुग्ण त्या राज्यांमधून महाराष्ट्रात येऊ नयेत. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याांनाही पत्र लिहिणार आहे.

४. कोरोनावरील लसीविषयी ८ जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात ‘ड्राय रन’ करणार असून त्यातून आपली यंत्रणा पडताळली जाणार आहे. यामध्ये काही त्रुटी आहेत का ? पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या मध्ये समन्वय आहे का ? याचीही पहाणी होईल.

५. लसीकरणाचा कार्यक्रम राबवू, त्या वेळी कोणतीही अडचण न येता कार्यक्रम राबवता यावा, यादृष्टीने सर्व करणार आहोत.

६. दारिद्य्ररेषेच्या खाली असणार्‍यांना लस विनामूल्य दिली पाहिजे, असा आग्रह आम्ही केंद्राकडे करू. गरिबांना लसीसाठी व्यय करायला लावणे योग्य नाही. तो व्यय केंद्राने करावा, अशी विनंती आम्ही केंद्राकडे करणार आहोत. जर केंद्राने व्यय केला नाही, तर राज्य शासनाच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. राज्याच्या अखत्यारित असणार्‍या लोकांना वार्‍यावर सोडले जाणार नाही.