शिवपूजनामागील अध्यात्मशास्त्र

प्रतीकात्मक छायाचित्र

शिवपिंडीचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घेणे

शिवालयात असणारा नंदी हे शिवाचे वाहन आहे. नंदीचे दर्शन घेतल्याने सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. शिवपिंडीचे दर्शन घेतांना भक्ताने शिवपिंडी अन् नंदी यांच्यामध्ये उभे राहू नये किंवा बसू नये, तर नंदी आणि शिवपिंडी यांना जोडणार्‍या रेषेच्या बाजूला उभे राहून पिंडीचे दर्शन घ्यावे.

शिवाला बेल वहाणे

शिवाला बेल वहावा. त्यामुळे शिवतत्त्वाचा अधिक लाभ होतो. बेल वहातांना तो पिंडीवर उपडा ठेवून पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र म्हणजेच टोक आपल्याकडे करून वहावा. यामुळे शिवाचे तारक तत्त्व पूजकाला मिळण्यास साहाय्य होते. सर्वसामान्य उपासकांची प्रकृती तारक स्वरूपाची असल्याने शिवाची तारक उपासना ही त्यांच्या प्रकृतीला जुळणारी आणि त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीस पूरक ठरणारी असते.

शिवाला श्‍वेत रंगाची फुले वहाणे

शिवाला निशिगंधाची फुले अथवा श्‍वेत रंगाची फुले  वहावीत. या फुलांच्या गंधामुळे शिवाचे तत्त्व पिंडीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.

शिवाला प्रदक्षिणा घालणे

शिवपिंडीला प्रदक्षिणा घालतांना घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने प्रारंभ करून अभिषेकाच्या पाण्याच्या पन्हाळीपर्यंत जावे आणि ती न ओलांडता परत फिरावे अन् पुन्हा पन्हाळीपर्यंत उलटे येऊन प्रदक्षिणा पूर्ण करावी. याचे कारण असे की, तेथे शक्तीस्रोत असतो. पन्हाळ ओलांडतांना शिवाच्या शक्तीशाली लहरी थेट अंगावर आल्याने उपासकाला त्या लहरींचा त्रास होण्याची शक्यता असते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शिव’)