अवैध मद्याची वाहतूक करणारे राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या वाहनाला धडक देऊन पसार

कृतीदलाच्या निरीक्षकाला धक्काबुक्की

अवैध मद्याची वाहतूक करणार्‍यांची मजल कुठपर्यंत गेली, हे राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे अन्यथा वाळू तस्करी करणारे जसे महसूल अधिकार्‍यांवर प्राणघातक आक्रमणे करतात, तशी वेळ त्यांच्यावर आल्यास आश्‍चर्य ते काय ?

प्रतिकात्मक छायाचित्र

सावंतवाडी – नाताळ आणि नूतन ख्रिस्ती वर्ष यांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोव्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या मद्याची वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. या पार्श्‍वभूमीवर २० डिसेंबरला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कृतीदलाला मिळालेल्या माहितीनुसार मद्य वाहतूक करत असलेल्या वाहनांचा पाठलाग करत होते. या वेळी मद्य वाहतूक करणार्‍या २ वाहनांपैकी एका वाहनाने उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या गाडीला सातजांभळी, इन्सुली येथे धडक देऊन पलायन केले, तर दुसर्‍या वाहनातील साहाय्यकाने कृतीदलाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांना धक्काबुक्की करून पलायन केले. (हप्तेबाजीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागावर ही वेळ आली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ? विभागातील काही हप्तेखोरांमुळे अवैध व्यावसायिकांना त्यांची भीती राहिलेली नाही. परिणामी त्यांची मजल पथकावर आक्रमण करण्यापर्यंत गेली आहे ! – संपादक)

वर उल्लेख केलेल्या दिवशी मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी ते बांदा अशी गस्त घालत असतांना २ गाड्यांतून मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यामुळे इन्सुली, सातजांभळीजवळ गाड्या येताच पहिल्या वाहनाच्या चालकाला पथकातील कर्मचार्‍यांनी थांबण्यास सांगितले; मात्र चालकाने उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला धडक देऊन पलायन केले. दुसरी गाडीही मागोमाग आली. यातील गाडीच्या साहाय्यकाला गाडीतून खाली उतरवत असताना त्याने निरीक्षक पांडुरंग पाटील यांना धक्काबुक्की केली आणि तो सावंतवाडीच्या दिशेने पसार झाला. याविषयीची तक्रार पाटील यांनी बांदा पोलीस ठाण्यात दिली असून चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.