विवाहाचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कार नाही ! – देहली उच्च न्यायालय

नवी देहली – जर महिला दीर्घ काळापासून संबंधित व्यक्तीसमवेत सतत शारीरिक संबंध ठेवत असेल, तर विवाहाचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच, असे नाही, असा निर्णय देत देहली उच्च न्यायालयाने एका महिलेची याचिका फेटाळली. विवाहाचे वचन देऊन बलात्कार करणार्‍या व्यक्तीच्या सुटकेला या महिलेने न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर हा निर्णय दिला. ‘आरोपीने माझी फसवणूक केली असून विवाहाचे खोटे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर दुसर्‍या महिलेसाठी सोडून दिले’, असा आरोप या महिलेने केला होता.

न्यायालयाने म्हटले की, जर पीडिता काही क्षणात शारीरिक संबंध ठेवण्यास सिद्ध झाली असेल, तर विवाहाचे आमिष दाखवून ते ठेवले गेले, असे आपण म्हणू शकतो. तसेच काही प्रकरणांमध्ये महिलेची इच्छा नसतांनाही विवाहाचे वचन महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यास प्रेरित करू शकते.