सामाजिक माध्यम म्हणून प्रसिद्ध असलेल्या फेसबूकने ‘बजरंग दल’ या संघटनेला ‘धोकादायक संघटना’ मानण्यास नकार दिला आहे. यामुळे अमेरिकेतील दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा भारतद्वेष आणि त्याहून अधिक हिंदुद्वेष उफाळून आला आहे. भारतातील सत्ताधारी हिंदु राष्ट्रवादी नेते आणि बजरंग दल यांच्या दबावामुळे फेसबूकने अशी भूमिका घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. वास्तविक ‘बजरंग दल’ ही संघटना धोकादायक कशी ? प्रामुख्याने हिंदु समाजाचे रक्षण, गोरक्षण, हिंदूंचे धर्मांतर रोखणे आदींसाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. असे असतांना तिला ‘धोकादायक’ अथवा ‘हिंसक संघटना’ किंवा ‘आतंकवादी संघटना’ म्हणून हिणवणे हे संतापजनक आहे. ‘फेसबूक’ हे सामाजिक माध्यम. त्याच्यावर अनेक जिहादी आतंकवादी संघटनांची खाती आहेत. या खात्यांवर धर्मांध युवकांना जिहादचा रस्ता निवडण्यासाठी आवाहन केले जाते. अनेक जिहादी आतंकवादी संघटना या खात्यांवरून आर्थिक साहाय्याचीही मागणी करत असतात. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला हे चालते; मात्र ‘बजरंग दला’चे खाते का चालत नाही ? यातून ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा हिंदुद्वेष दिसून येतो. अमेरिकी पत्रकारिता ही सुधारणावादी, पुरोगामी किंवा धर्मनिरपेक्ष असल्याचे बोलले जाते. त्याहून अधिक तेथील प्रसारमाध्यमांना मानवाधिकारांचा पुळका असतो; मात्र हे मानवाधिकार केवळ काही ठराविक पंथ, समाज यांच्यापुरते मर्यादित असतात. जगाच्या पाठीवर हिंदु समाज आहे आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहे, हे या प्रसारमाध्यमांच्या खीजगणतीतही नसते किंवा ते त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. याविषयी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ काही बोलत नाही. अमेरिका ही महासत्ता असल्यामुळे इतरांना तुच्छ लेखणे किंवा ‘जगातील सर्वांचे आपणच कैवारी आहोत’, या थाटात ती वावरत असते. तेथील प्रसारमाध्यमांमध्येही हीच वृत्ती दिसून येते. ‘जगातील सर्व समस्यांविषयी आपल्यालाच ज्ञान आहे किंवा त्या समस्यांविषयी आपल्याकडेच उपाययोजना आहेत’, अथा थाटात या प्रसारमाध्यमांमध्ये कार्यरत असलेली मंडळी लिखाण करत असतात. या प्रसारमाध्यमांचे बहुतांश प्रतिनिधी हे भारतातील मोठ्या शहरांमध्ये वावरत काहीही अभ्यास न करता भारताविषयी मते मांडतांना दिसतात. त्यामुळे हिंदूंच्या समस्यांच्या विरोधात आवाज उठवणारे त्यांना ‘हिंसक’ वाटतात. भारतात मंदिरांचे रक्षण, गोरक्षण किंवा हिंदूंचे रक्षण या गोष्टी करणे पाप आहे का ?
त्यामुळे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा हिंदुद्वेष आता हिंदूंनी आणि त्याही पुढे जाऊन भारत सरकारने खपवून घेऊ नये, असे हिंदूंना वाटते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अमेरिका किंवा अन्य पाश्चात्त्य देश यांना श्रेष्ठ समजून त्यांचे अनुकरण करण्याचा प्रकार भारतात चालू झाला; मात्र आता हिंदुत्वनिष्ठांचे सरकार स्थापन झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू पालटत आहे. हिंदूंमध्येही जागृती निर्माण होत आहे. त्यामुळे स्वतःवर होणार्या अन्यायाच्या विरोधात हिंदू तात्काळ आवाज उठवतात. आताही या प्रकरणी हिंदूंनी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला विविध सामाजिक माध्यमांद्वारे जाब विचारावा, तसेच सरकारनेही अशांना खडसवावे. असे केले, तरच हिंदु समाजाला किंवा भारताला ‘गृहीत’ धरण्याचा जो प्रकार विदेशी प्रसारमाध्यमांकडून होत आहे, तो थांबला जाईल. असे केल्याने अन्य हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी विदेशी प्रसारमाध्यमांवर वचक बसेल, हेच खरे !