पाकिस्तानात बलात्कार्‍यांना नपुंसक बनवण्याचा कायदा लागू !

  • विशेष न्यायालये स्थापन करून ४ मासांतच निकाल लावणार

  • योग्य प्रकारे अन्वेषण न करणारे पोलीस आणि सरकारी अधिकारी यांना दंड होणार

पाकिस्तान असा कायदा बनवू शकतो, तर त्याच्यापेक्षा अधिक पुढारलेला असलेला भारत का बनवू शकत नाही ?

बलात्कार्‍यांना नपुंसक बनवण्याच्या कायद्यावर राष्ट्रपती अरिफ अल्वी यांची स्वाक्षरी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये बलात्कार्‍यांना नपुंसक बनवण्याच्या कायद्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्याने आता त्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. वारंवार असा गुन्हा करणार्‍यांना नपुंसक बनवण्यात येणार आहे.

१. या नव्या कायद्यामध्ये बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात सहभागी असणार्‍यांची राष्ट्रीय नोंद ठेवण्यात येणार आहे. तसेच यातील पीडितेची ओळख गुप्त ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. बलात्काराच्या प्रकरणांची लवकर सुनावणी व्हावी यासाठी देशभरात विशेष न्यायालयेही उभारली जाणार आहेत. ४ मासांच्या आत अशा प्रकरणांचा निकाल लावला जाईल.

२. पीडितेची ओळख घोषित करण्यास मनाई असतांनाही ती उघड केल्यास शिक्षा होऊ शकते. जर पोलीस आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून योग्य प्रकारे अन्वेषण झाले नाही, तर त्यांना दंड आणि ३ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, तसेच पोलीस किंवा सरकारी अधिकारी यांना चुकीची माहिती देणार्‍यांनाही शिक्षा दिली जाईल.