वर्ष १५५५ मध्ये बलुचिस्तानच्या नागरिकांच्या पाठिंब्याने हुमायूनने देहलीवर पुन्हा ताबा मिळवला. वर्ष १६५९ मध्ये मोगल सम्राट औरंगजेब देहलीचा शासक बनला. त्याची सत्ता पश्चिमेला इराणी सीमेपर्यंत पसरली होती; परंतु दक्षिणेत त्याला सतत मराठ्यांकडून आव्हानांना तोंड द्यावे लागत असे. त्यानंतर बलुची सरदारांनी मोगल राजवटीविरुद्ध बंड केले आणि बलुची नेता मीर अहमद याने वर्ष १६६६ मध्ये औरंगजेबाकडून बलुचिस्तानचे २ भाग कलात आणि क्वेट्टा जिंकले. बलुच कोण आहेत ?, जे त्यांच्या गनिमी काव्याच्या कौशल्यासाठी आणि लढाऊ स्वभावासाठी ओळखले जातात अन् ते पाकिस्तानविरुद्ध का लढत आहेत ?, याविषयीची सविस्तर माहिती येथे दिली आहे.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘बलुच पाकिस्तानात कसे आले ?, आधुनिक बलुचिस्तानचा इतिहास १५० वर्षांचा, भारताप्रमाणेच कलातमध्येही स्वातंत्र्याची मागणी झाली तीव्र, बलुचिस्तान ११ ऑगस्ट १९४७ या दिवशी वेगळा देश; पण ब्रिटनने आणला अडथळा आणि बलुचिस्तान २२७ दिवस स्वतंत्र; पण पुढे बंड चालू झाले’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/898767.html
९. बलात्काराच्या घटनेनंतर ५ वे बंड चालू झाले आणि पाकवर सूड उगवण्याची बुगतींची प्रतिज्ञा
२ आणि ३ जानेवारी २००५ ची रात्र होती. बलुचिस्तानमधील सुई भागातील ‘पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड रुग्णालया’त काम करणार्या एक महिला डॉक्टर त्यांच्या खोलीत झोपल्या होत्या. तिच्यावर एका पाकिस्तानी लष्करी कॅप्टनने बलात्कार केला. कॅप्टनला अटक करण्याऐवजी त्याला संरक्षण देण्यात आले; कारण तो राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचा जवळचा सहकारी होता.
अन्वेषणाच्या नावाखाली पीडितेला प्रथम मनोरुग्णालयात पाठवण्यात आले. तिच्यावर खोटे आरोप लावण्यात आले, गुप्तहेर कारवाया घडल्या. ती महिला डॉक्टर आणि तिच्या पतीला पाकिस्तान सोडून ब्रिटनला जाण्यास भाग पाडण्यात आले. ही घटना बलुचिस्तानमध्ये घडली. त्यानंतर बुगती जमातीचे प्रमुख नवाब अकबर खान बुगती यांनी ते त्यांच्या जमातीच्या राज्यघटनेचे उल्लंघन असल्याचे म्हटले. बुगती यांनी यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते; पण तोपर्यंत ते ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बी.एल्.ए.)’चे नेते बनले होते आणि बलुचिस्तानच्या हक्कांसाठी लढत होते. या घटनेमुळे बुगतींना पाकिस्तान सरकारविरुद्ध सूड घेण्याची संधी मिळाली. त्यांनी कोणत्याही किंमतीत सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. बलुच बंडखोरांनी सुई गॅस क्षेत्रावर रॉकेटने आक्रमण केले. अनेक सैनिक मारले गेले. प्रत्युत्तरादाखल मुशर्रफ यांनी लढाईसाठी आणखी ५ सहस्र सैनिक पाठवले. अशा प्रकारे बलुचांच्या ५ व्या बंडाला प्रारंभ झाला.
१०. पाकिस्तान सैन्याकडून बलुचींवर आणि बलुचींकडून पाकवर आक्रमणे केली जाणे
१७ मार्चच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने अकबर बुगती यांच्या घरावर बाँबद्वारे आक्रमण केले. यामध्ये ६७ जणांचा मृत्यू झाला. अकबर बुगती यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या हत्येमुळे बलुच लोकांमध्ये आणखी संताप निर्माण झाला. पाकिस्तान सरकारविरुद्धचा त्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला. तथापि २६ ऑगस्ट २००६ या दिवशी भांबूर टेकड्यांमध्ये लपलेल्या अकबर बुगती आणि त्यांच्या डझनभर साथीदारांवर बाँबद्वारे आक्रमण करून त्यांना ठार मारण्यात आले.
बुगतींच्या हत्येने बलुचिस्तानातील सर्व जमाती एकत्र आल्या. बलुच सैनिकांनी पाकिस्तानातील अनेक भागांमध्ये आक्रमणे करून प्रत्युत्तर दिले. तत्कालीन राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्या हत्येचा प्रयत्नही करण्यात आला होता. बुगती यांच्यानंतर ‘बी.एल्.ए.’चे नेतृत्व नवाबजादा बालाच मारी यांनी केले; परंतु वर्ष २००७ मध्ये पाकिस्तानी सैन्याने त्यांनाही मारले. वर्ष २००९ पासून ‘बी.एल्.ए.’ने पंजाबींना लक्ष्य करण्यास प्रारंभ केले आणि बलुचिस्तानमध्ये ५०० हून अधिक पंजाबी मारले गेले. यानंतर पाकिस्तानी सैन्याने बलुचांना पद्धतशीरपणे गायब करण्यास प्रारंभ केला. माध्यमांच्या अहवालानुसार गेल्या १५ वर्षांत पाकिस्तानी सैन्याने ५ सहस्रांहून अधिक बलुचांना बेपत्ता केले आहे. त्यांना एकतर मारण्यात आले किंवा अशा ठिकाणी तुरुंगात ठेवण्यात आले आहे, ज्याविषयी कोणतीही बातमी नाही.
११. चीनने बलुचिस्तानमध्ये चालू केलेल्या प्रकल्पाला बलुचांकडून विरोध
बलुचिस्तान हा ‘चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (आर्थिक महामार्ग)’चा एक महत्त्वाचा भाग आहे. हा प्रकल्प चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’चा (व्यापार, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मिती यांच्याद्वारे आशिया, आफ्रिका आणि युरोप या खंडातील विविध देशांना चीनशी जोडण्याचा प्रकल्प) एक भाग आहे. बलुचिस्तानमध्ये ग्वादर बंदर आहे, जे या प्रकल्पातील सर्वांत महत्त्वाचे स्थान मानले जाते. पाकच्या ग्वादर बंदराला शिनजियांगशी जोडण्यासाठी चीनने आतापर्यंत ४६ अब्ज डॉलर्स (३ सहस्र ९०० कोटी रुपयांहून अधिक) व्यय केले आहेत. अरब देशांची संसाधने स्वतःच्या देशात आणण्यासाठी चीन ग्वादर बंदरावर इतका व्यय करत आहे. चीन बलुचिस्तानमधील रस्ते रुंदीकरण करत आहे आणि विमानतळ बांधण्यात व्यस्त आहे; पण बलुची नागरिक यामध्ये समस्या निर्माण करत आहेत.
(समाप्त)
– संजय झा, इस्लामाबाद, पाकिस्तान.
(साभार : दैनिक ‘दिव्य मराठी’चे संकेतस्थळ)