‘सत् आणि सत्संग हेच चैतन्य, आनंद आणि समाधान यांचा मुख्य स्रोत असल्यामुळे त्याविना राहू शकत नाही’, हे लक्षात आणून दिल्याविषयी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

सौ. शरण्या देसाई

१. भारतात सुरक्षितता आणि अमेरिकेच्या तुलनेत साधना चांगली होऊ शकत असल्यामुळे इथे परत यावेसे वाटणे

‘विवाहानंतर अमेरिकेत आल्यापासून ‘येथे पुष्कळ रज-तम आहे’, असे माझे मत असल्याने ‘मला भारतात परत जावे’, असे वाटत होते. भारतात मला सुरक्षित वाटत असल्याने आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात साधना चांगली होऊ शकत असल्याने मला इथे परत यावेसे वाटत होते. मी भारतात यायचे, त्या वेळी केवळ माझ्या सासरी आणि माहेरी अशा दोनच ठिकाणी जात असे. असे असले, तरी भारतातील माझे वास्तव्य माझी साधना अधिक चांगली होण्यास साहाय्यभूत ठरत नव्हते; कारण भारतात अमेरिकेच्या तुलनेत अधिक दायित्व असते. याचाच अर्थ मी भारतात असतांना रज-तम प्रधान गोष्टी अधिक प्रमाणात होत असतात. माझ्या भारतातील ३ – ४ मासांच्या (महिन्यांच्या) वास्तव्याच्या कालावधीत मी काही दिवसांसाठी रामनाथी (गोवा) आश्रमात जाते आणि केवळ इथे आलेल्या अनुभूतींचा ठेवा मी परत येतांना घेऊन येते.

गेल्या ३ – ४ वर्षांपासून मला ‘भारतात परत जाऊन कुटुंबियांना भेटल्यावर बरे वाटेल’, असे वाटत होते. खरेतर मला जाणवत असलेला एकाकीपणा हा मानसिक स्तरावरचा असल्याने मला कुटुंबियांची आठवण येत असे आणि ‘त्यांच्यासह रहावे’, असे वाटत असे. या सर्वांचा अध्यात्माशी संबंध नव्हता. उलट भारतात माझे उपाय आणि साधना नियमित होत नसल्याने अमेरिकेच्या तुलनेत माझ्या देहाभोवतीचे नकारात्मक आवरण अधिक असायचे, याची जाणीव मला फार अल्प होती.

२. गुरुमाऊलीचे वास्तव्य असलेले आश्रमच खरे घर असून तेथील साधक कुटुंबीय असल्याचे वाटणे

या वर्षी मी भारतात आल्यावर ‘मी माया आणि रज-तम यांकडे अधिकाधिक ओढली जाते’, असे माझ्या लक्षात आले. ही ठिकाणे माझ्या साधनेसाठी पूरक नाहीत. साधकांसमवेत रहाणे किंवा सत्मध्ये रहाणे हे माझ्यासाठी चैतन्य, आनंद आणि समाधान यांचा मुख्य स्रोत असल्यामुळे मी त्यासाठी आसुसलेले होते. २५ वर्षे मी ज्या घरात लहानाची मोठी झाले आणि आताही मी रहायला येते, ‘ते माझे घर किंवा हे माझे कुटुंब आहे’, असे मला वाटत नाही. माझे खरे घर आश्रम आहे, जिथे माझी गुरुमाऊली रहाते आणि तिथे रहाणारे साधक माझे कुटुंबीय आहेत. मला असे यापूर्वी कधीच जाणवले नव्हते.

३. खर्‍या कुटुंबियांविना (साधकांविना) राहू न शकणे आणि हीच खरी समष्टी साधना असल्याचे जाणवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक यांची आठवण येत असल्याने मला ‘माझ्या घरी (आश्रमात) जावे’, असे तीव्रतेने वाटत होते. याचा अर्थ माझ्या मनात ‘माझ्या कुटुंबियांविषयी नकारात्मकता आहे’, असे अजिबात नाही. मला माझ्या कुटुंबियांची काळजी आहे आणि मी त्यांच्या संपर्कातही आहे; मात्र मला का कुणास ठाऊक ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरणच आता माझे घर आहे’, असे मला वाटते. पृथ्वीतलावर मी कोणत्याही देशात गेले, तरी ‘मी माझ्या खर्‍या कुटुंबियांविना (साधकांविना) राहू शकत नाही’, असे मला वाटते. सत् चा प्रसार करणे आणि साधकांना शोधून त्यांच्याशी जवळीक साधणे, हीच खरी समष्टी साधना आहे.

मला ही जाणीव आणि शिकवण दिल्याविषयी, तसेच आम्हा सर्व साधकांना कुटुंबाप्रमाणे एकत्रित आणल्याने मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते. ‘अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी होण्यासाठी मला पात्र बनवावे आणि गुरुसेवा करण्यासाठी माझी क्षमता वाढवावी’, हीच प.पू. गुरुदेवांच्या चरणकमली प्रार्थना आहे.’

– सौ. शरण्या देसाई, अमेरिका (१७.४.२०१७)