जिल्हा पंचायत निवडणुकीची आज मतमोजणी : विद्यमान सरकारसाठी कसोटी

१५ केंद्रांमध्ये होणार मतमोजणी

प्रतिकात्मक चित्र

पणजी, १३ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील ४८ जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी १२ डिसेंबर या दिवशी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबर या दिवशी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी १५ केंद्रे अधिसूचित केली आहेत. सर्व केंद्रांमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत शासनासाठी ही निवडणूक म्हणजे एक कसोटीच असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. या निवडणुकीत भाजपसमवेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मगोप आणि आप हे महत्त्वाचे राजकीय पक्ष रिंगणात उभे आहेत. सर्व पक्षांनी विजयाचा दावा केला आहे.-

नियमांमध्ये ‘नोटा’ पर्याय उपलब्ध नसल्याने जि.पं. कायद्यात सुधारणा करणे आवश्यक ! – राज्य निवडणूक आयोग

पणजी – जिल्हा पंचायत निवडणुकीच्या नियमांमध्ये ‘नोटा’चा (एकही लायक उमेदवार नसल्यास उपलब्ध असलेला पर्याय) पर्याय उपलब्ध नाही. यासाठी जिल्हा पंचायतीच्या कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. (नियमांमध्ये हा पर्याय उपलब्ध नसल्याचे निवडणूक आयोगाच्या आणि एकाही राजकीय पक्षाच्या लक्षात का आले नाही ? कुणीतरी आवाज उठवल्यावर आयोग जागा होतो, हे अपेक्षित नाही ! – संपादक) १२ डिसेंबर या दिवशी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत ‘नोटा‘ पर्याय उपलब्ध नसल्याची तक्रार ज्येष्ठ पत्रकार अनिल लाड आणि ‘आप’ या राजकीय पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीवरून राज्य निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.

आश्‍वासन देऊनही विकलांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर अपेक्षित सुविधा न पुरवल्याचा ‘ड्रग’ संस्थेचा दावा

पणजी – जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी अनेक मतदान केंद्रांमध्ये विकलांग मतदारांना सुलभतेने मतदान करण्यासाठी अपेक्षित सुविधा राज्य निवडणूक आयोगाने आश्‍वासन देऊनही न पुरवल्याचा दावा ‘डिसएबिलिटी रायट्स असोसिएशन ऑफ गोवा’चे (ड्रग) अध्यक्ष अवेलिनो डिसा यांनी केला आहे.

‘ड्रग’चे अध्यक्ष अवेलिनो डिसा म्हणाले, ‘‘मी काही दिवसांपूर्वी समाज कल्याण खात्याचे संचालक आणि राज्य विकलांग आयुक्त, तसेच राज्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना जि.पं. निवडणुकीसाठी विकलांग मतदारांना मतदान केंद्रांमध्ये सुलभतेने जाता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याविषयी सांगितले होते. ही सुविधा उपलब्ध करण्याचे आश्‍वासनही देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात अनेक मतदान केंद्रांमध्ये अशी सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. याविषयी अनेकांनी ‘ड्रग’कडे तक्रारी केल्या.’’