Bangladesh Elections : बांगलादेशामध्ये पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुका ! – महंमद युनूस

अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस यांनी दिली माहिती

महंमद युनूस

ढाका (बांगलादेश) – सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा वर्ष २०२५ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या पूर्वार्धात ठरवल्या जाऊ शकतात. निवडणुकीपूर्वी काही महत्त्वाच्या सुधारणा कराव्यात, असा माझा नेहमीच आग्रह असतो. राजकीय पक्षांनी काही आवश्यक सुधारणांवर सहमती दर्शवल्यास, वर्ष २०२५ मध्ये नोव्हेंबरच्या अखेरीस निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस यांनी दिली. १६ डिसेंबरला बांगलादेशाचा ५३ वा स्वातंत्र्यदिन आहे. यानिमित्त युनूस यांनी राजधानी ढाका येथील राष्ट्रीय स्मारकात जाऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. वर्ष १९७१ मध्ये भारताच्या साहाय्याने बांगलादेशाला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाले होते.

१. महंमद युनूस यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांत मतदानासाठी पात्र ठरलेल्यांची नावे मतदार सूचीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेणार आहोत. विद्यार्थ्यांच्या बंडानंतर अनेक तरुण मोठ्या कालावधीनंतर पहिल्यांदाच मतदान करणार असल्याने मतदान प्रक्रियेमध्ये त्रुटी रहाणार नाही, याची काळजी घेणार आहोत.

२. वर्ष १९७१ च्या युद्धात सहभागी झालेले ८ भारतीय सैनिक आणि २ कार्यरत अधिकारी बांगलादेशाच्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ढाका येथे पोचले होते.

३. १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पाकिस्तानी सैन्याच्या ९३ सहस्र सैनिकांनी भारतासमोर शरणागती पत्करली होती. त्यानंतर बांगलादेशाला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाले.

संपादकीय भूमिका 

ऑगस्ट मासामध्ये बांगलादेशात हिंसाचार झाल्यानंतर युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करून पुढील ३ मासांनी निवडणुका घेण्याचे घोषित करण्यात आले होते; मात्र युनूस यांच्या माहितीनुसार आणखी एक वर्ष तरी येथे निवडणुका होणे शक्य नाही. यातून युनूस यांना एकछत्र राज्यकारभार करण्यासह हिंदूंवर अत्याचार करायचे आहेत, हे स्पष्ट होते !