‘व्‍होट जिहाद’ला (मतदान जिहादला) ‘धर्मयुद्धा’ने उत्तर !

१. धर्मयुद्ध हा हिंदु धर्माचा भाग

‘महाराष्‍ट्र विधानसभा निवडणुकीच्‍या वेळी मतदाराला संबोधित करतांना देवेंद्र फडणवीस यांनी  ‘व्‍होट जिहाद’ला हरवण्‍यासाठी धर्मयुद्ध करण्‍याचे आवाहन केले होते. त्‍यावरून पुरोगाम्‍यांनी एकच काहूर माजवले आणि ‘भाजपचा उत्तरदायी नेता अशा प्रकारची विधाने कसे करू शकतो ?’, असा प्रश्‍न उपस्‍थित केला. या पार्श्‍वभूमीवर हिंदु धर्म आणि इतर पंथ यातील भेद समजून घेणे आवश्‍यक आहे. अनादी काळापासून हिंदु धर्म अस्‍तित्‍वात असून तो ईश्‍वरनिर्मित आणि आदि अनादी आहे. त्‍यामुळे सर्वधर्मसमभाव ही खुळचट कल्‍पना आहे. हिंदूंमध्‍ये विविध उपासनापद्धती होत्‍या. ऋषिमुनी, शंकराचार्य, रामकृष्‍ण परमहंस, गौतम बुद्ध, स्‍वामी विवेकानंद यांच्‍यापासून थेट स्‍वातंत्र्यवीर सावरकरांंपर्यंत या सर्वांनी हिंदु धर्म त्‍यांच्‍या परिने समजावून सांगण्‍याचा प्रयत्न केला.

धर्माची संकल्‍पना व्‍यापक आहे. श्रीकृष्‍णाने अर्जुनाला सांगितलेल्‍या गीतेमध्‍ये धर्माचा सार कर्तव्‍याच्‍या रूपात दिलेला आहे. त्‍यांनी प्रत्‍येकाचे कर्तव्‍य, म्‍हणजे धर्म असल्‍याचे सांगितले. हिंदूंच्‍या पुरातन ग्रंथांमध्‍ये आचार्य, शिष्‍य, पिता, पुत्र, पत्नी, राजा सैनिक यांचे धर्म, म्‍हणजेच कर्तव्‍य वैशिष्‍ट्यपूर्ण समजावून सांगितले आहे. फडणवीस यांनी केवळ हिंदूंना धर्मयुद्ध करण्‍याची विनंती केली आणि हलकल्लोळ माजला.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. काश्‍मिरी हिंदूंच्‍या विरोधात धर्मांधांचा जिहाद

अनुमाने वर्ष १९९० च्‍या दशकात पाकिस्‍तानने आवाहन केल्‍यावर काश्‍मिरी मुसलमानांनी सहस्रो हिंदूंना ठार केले आणि अन्‍य हिंदूंना घरदार सोडून पलायन करावे लागले. तेव्‍हापासून ते ३५ वर्षे त्‍यांच्‍याच देशात विस्‍थापिताचे जीवन जगत आहेत. दुसरीकडे बाहेरून आलेले बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्‍या सर्व ओळखपत्रे मिळवून भारतात दिमाखाने रहात आहेत, तसेच त्‍यांच्‍या मालकांना एकगठ्ठा मतदान करत आहेत. १४.९.१९९० या दिवशी काश्‍मीरमध्‍ये टीकालाल यांची हत्‍या करण्‍यात आली. त्‍यानंतर न्‍यायाधीश निळकंठ गंजू यांना भर दिवसा ठार करण्‍यात आले. तेव्‍हा गुल भट या आतंकवाद्याला शिक्षा झाली. फुटीरतावादी यासीन मलिकला विचारण्‍यात आले, ‘तुमच्‍या समवेत दशकानुदशके रहाणार्‍या हिंदु शेजार्‍यांना का मारले ?’ तेव्‍हा त्‍याने निर्लज्‍जपणे सांगितले, ‘मुसलमान पंथात सांगितल्‍याप्रमाणे मूर्तीपूजा करणारे हे काफिर आहेत आणि त्‍यांना मारणे, हे त्‍यांचे कर्तव्‍य आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या पंथाचा आदेश पाळणे, हा त्‍यांचा धर्म आहे.’

३. हिंदूंच्‍या धर्मकर्तव्‍याने अधर्मावर मात

भगवान श्रीकृष्‍ण अर्जुनाला भगवद़्‍गीतेच्‍या ३१, ३२ व्‍या श्‍लोकात गुरुजन, बंधू, काका, आजोबा आदी नात्‍यांविषयी सांगतांना ‘नात्‍यागोत्‍यापेक्षा धर्मकर्तव्‍य आणि क्षत्रिय धर्म महत्त्वाचा आहे’, असे सांगितले. ३२ व्‍या श्‍लोकातही अनेक प्रकारची कर्तव्‍ये धर्माचा आधार घेऊन सांगितलेली आहेत; परंतु केवळ फडणवीस यांनी निवडणुकीच्‍या काळात धर्मयुद्ध या शब्‍दाचा उच्‍चार केला आणि त्‍यावरून पुरोगाम्‍यांनी आकाश-पाताळ एक केले.

२३.११.२०२४ या दिवशी महाराष्‍ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाविकास आघाडीचे पानिपत झाले. हिंदु मतदारांनी धर्मयुद्धाप्रमाणे त्‍यांचे कर्तव्‍य बजावले. त्‍यांनी भाजप, शिवसेना आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस यांच्‍या युतीला भरघोस मतदान केले. पुरोगाम्‍यांना धर्मांधांनी धर्माच्‍या नावावर केलेली दुष्‍कृत्‍ये केली, तर चालतात; पण हिंदूंनी धर्माचा उच्‍चार करायचा नाही, असे त्‍यांना वाटते. आता हिंदू जागृत झाले आहेत, हेच वर्ष २०२४ च्‍या विधानसभा मतदानाच्‍या वेळी दिसून आले.’ (६.१२.२०२४)

श्रीकृष्‍णार्पणमस्‍तु ।

– (पू.) अधिवक्‍ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्‍च न्‍यायालय