कार्तिक आणि मार्गशीर्ष मासातील शुभ-अशुभ दिवस अन् त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत. तसेच १४.१२.२०२० या दिवशीच्या खग्रास सूर्यग्रहणाविषयीची माहिती येथे देत आहोत.

१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, दक्षिणायन, शरदऋतू आणि कार्तिक मास चालू आहे. १५.१२.२०२० पासून मार्गशीर्ष मास आणि हेमंतऋतू चालू होणार आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

२ अ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. १३.१२.२०२० या दिवशी दुपारी २.१८ पर्यंत आणि १७.१२.२०२० या दिवशी उत्तररात्री २.४५ पासून १८.१२.२०२० या दिवशी दुपारी २.२३ पर्यंत विष्टी करण आहे.

सौ. प्राजक्ता जोशी

२ आ. दर्श अमावास्या : अमावास्या तिथीचे मधले पाच प्रहर (दुसर्‍या प्रहरापासून सहाव्या प्रहरापर्यंत) हे ‘दर्श’ संज्ञक मानतात. रविवार, १३.१२.२०२० या दिवशी उत्तररात्री १२.४५ पासून १४.१२.२०२० या दिवशी रात्री ९.४७ वाजेपर्यंत अमावास्या तिथी आहे.

२ इ. सोमवती अमावास्या : सोमवारी अमावास्या तिथी आल्यास ‘सोमवती योग’ होतो. या योगावर तीर्थस्नान, अश्‍वत्थ पूजन, विष्णुपूजन करावे. सोमवारी १४.१२.२०२० या दिवशी ‘सोमवती अमावास्या’ आहे.

२ ई. देवदीपावली : मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदेला देवदीपावलीचा कुलधर्म करतात. आपल्या कुलदेवतेला अभिषेक करून नैवेद्य दाखवला जातो. देवदिवाळीचा कुलधर्म मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदेला करणे शक्य न झाल्यास मार्गशीर्ष मासात कोणत्याही दिवशी करता येतो.

२ उ. मार्तंड भैरव (मल्हारी खंडोबा) उत्सव, षड्रात्रोत्सवारंभ : मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते षष्ठी तिथीपर्यंत मार्तंड भैरवाचा (मल्हारी खंडोबाचा) उत्सव असतो. या सहा दिवसांच्या उत्सवाला ‘षड्रात्रोत्सव’, ‘खंडोबाचे नवरात्र’ किंवा ‘सटीचे नवरात्र’ असेही म्हणतात. पहिल्या दिवशी देव खंडोबाची स्थापना करून त्याची पूजा करतात. सहा दिवस अखंड नंदादीप लावतात. पहिल्या दिवशी फुलांची एक माळ, दुसर्‍या दिवशी दोन, असे क्रमाने वाढवत जाऊन सहाव्या दिवशी सहा माळा घालतात. प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी पूजा करून आरती करतात. तबकातील नारळ खंडोबावरून ओवाळून फोडल्यावर त्याचा प्रसाद आणि भंडारा सर्वांना देतात. सहाव्या दिवशी भरीत-रोडग्याचा आणि कांद्याच्या पातीचा नैवेद्य असतो. त्या दिवशी खंडोबापुढे गोंधळ घालतात.

२ ऊ. धनुर्मासारंभ : सूर्य ग्रहाचा धनु राशीत प्रवेश झाल्यावर दुसर्‍या दिवशी धनुर्मासाचा प्रारंभ होतो. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी धनुर्मास समाप्ती असते. यालाच ‘धुंधूरमास’ असेही नाव आहे.

२ ए. चंद्रदर्शन : अमावास्येनंतर चंद्राचे प्रथम दर्शन ‘चंद्रकोर’ रूपात होते. हिंदु धर्मात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदर्शन होणे भाग्यकारक आहे; कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. सूर्यास्तानंतर लगेचच केवळ थोड्या वेळासाठी चंद्रकोर दिसते. या तिथीची देवता ब्रह्मा आहे. १६.१२.२०२० या दिवशी सायंकाळी ७.५४ पर्यंत चंद्रदर्शन आहे.

२ ऐ. दग्ध योग : दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. १६.१२.२०२० या दिवशी बुधवार असून सायंकाळी ४.५५ पासून तृतीया तिथीला आरंभ होत असल्याने ‘दग्ध योग’ आहे.

२ ओ. नागपूजन-नागदिवे : मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमीला नागपूजन करून दिवे लावतात. या दिवशी स्नानदानादी पुण्यकृत्ये करून नागदेवतेची कृपा संपादन करावयाची असते. ‘नागपूजनासाठी पंचमी तिथी सूर्योदयानंतर न्यूनतम ६ घटी (२ घंटे २४ मिनिटे) असावी’, असा सर्वसाधारण नियम असतो.

२ औ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १९.१२.२०२० सायंकाळी ७.४० पासून धनिष्ठा नक्षत्र आरंभ आणि २०.१२.२०२० दुपारी २.५३ पर्यंत शुक्ल पक्ष षष्ठी तिथी संपेपर्यंत घबाड मुहूर्त आहे.


१४.१२.२०२० या दिवशी होणारे खग्रास सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही !

‘कार्तिक अमावास्या, सोमवार, १४.१२.२०२० या दिवशी होणारे खग्रास सूर्यग्रहण हे संपूर्ण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात या सूर्यग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.

१. ग्रहण दिसणारे प्रदेश : दक्षिण अमेरिका खंड, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर आणि अंटार्क्टिका खंडाचा काही भाग
२. ग्रहण आरंभ : सायंकाळी ७.०४ मि.
३. ग्रहण मध्य : रात्री ९.४३ मि.
४. ग्रहण समाप्ती : रात्री १२.३० मि.
५. ग्रहण पर्व (ग्रहणाचा कालावधी) : २.३९ मि.
(वरील सर्व वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार आहेत.)’
(संदर्भ : दाते पंचांग)

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषणशास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (३०.११.२०२०)


टीप १ – शिवरात्री, भद्रा (विष्टी करण), दर्श अमावास्या, अन्वाधान, विनायक चतुर्थी आणि घबाड मुहूर्त यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.

टीप २ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.

हरिचिया दासा हरि दाही दिशा ।
भावें जैसा तैसा हरि एक ॥ – संत एकनाथ

अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.

तुका म्हणे हरिच्या दासा ।
शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’

ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्‍वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्‍वर घेतो.’