प्रार्थना मंदिर पाडण्याच्या निर्णयाला भक्तांचा विरोध
अमरावती – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे साकारलेले प्रार्थना मंदिर हे जीर्ण झाल्याने तेथे भव्य नवीन प्रार्थना मंदिर बांधण्यात आले आहे. त्यामुळे ‘जुने प्रार्थना मंदिर पाडले जाणार’, अशी भीती काही भक्तांना आहे. जुने मंदिर पाडण्याच्या निर्णयाला भक्तांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. १४ डिसेंबर या दिवशी राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी गुरुदेव भक्त आणि महिला यांनी निषेध आंदोलन करून महाद्वारस्थळी भजन केले. या वेळी ‘अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाला जुने प्रार्थना मंदिर पाडू नये’, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा भव्य आश्रम आहे. राष्ट्रसंतांची संकल्पना आणि गुरुदेव भक्तांचे श्रमदान यांतून गुरुकुंज मोझरी येथे महाराजांचा आश्रम आणि समाधीस्थळ बांधण्यात आले आहे. जुन्या आश्रमातील प्रत्येक वस्तू ही राष्ट्रसंतांच्या स्पर्शाने पावन झाली असून लाखो गुरुदेव भक्तांच्या भावना आश्रमातील प्रत्येक वस्तूशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आश्रमातील कुठलीही वास्तू पाडू न देण्याचा निर्धार गुरुदेव भक्तांनी केला आहे.