Karnataka In Bankruptcy :  गत विधानसभा निवडणूक काळात मतदारांना दिलेल्या प्रलोभनांमुळे कर्नाटक राज्य आर्थिक दिवाळखोरीत !

केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री प्रल्हाद जोशी यांची टीका

पत्रकार परिषदेत डावीकडून तिसरे प्रल्हाद जोशी, तसेच अन्य (संकेतस्थळावर)

कोल्हापूर, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रात निवडून आल्यास महिलांना ३ सहस्र रुपये देऊ, तसेच अन्य विविध घोषणा काँग्रेस सहभागी असलेल्या महाविकास आघाडीने केल्या आहे. काँग्रेस सरकारने गत विधानसभा निवडणूक काळात कर्नाटक राज्यात अशाच प्रकारे महिलांना विनामूल्य बसप्रवास, २०० युनिट वीज विनामूल्य, प्रत्येकाला १० किलो तांदूळ, ‘गृहलक्ष्मी योजने’च्या अंतर्गत महिलांना २ सहस्र रुपये यांसह अन्य काही लाभ देऊ केले. या लाभामुळे कर्नाटक राज्य आज आर्थिक दिवाळखोरीत असून कर्मचार्‍यांचे वेतन वेळवर न होणे, निवृत्तीवेतन देता न येणे, विधवांना सानुग्रह अनुदान देता न येणे यांसह गंभीर समस्यांनी कर्नाटक राज्य ग्रस्त आहे.

तरी काँग्रेसच्या फसव्या आवाहनास मतदारांनी भुलू नये, असे आवाहन केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकार परिषदेत केले.

प्रल्हाद जोशी पुढे म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकारने कर्नाटक राज्यात १० किलो तांदूळ देण्याची घोषणा केल्यानंतर सध्याच्या स्थितीला ते राज्यातील नागरिकांना तांदूळ देत नाहीत; कारण केंद्राकडून ते खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे निधी नाही. केंद्र सरकार त्यांना २८ रुपये प्रतिकिलो इतक्या अल्प मूल्यात तांदूळ देण्यास सिद्ध आहे, असे असतांनाही त्यांनी तांदूळ खरेदी केलेला नाही. केवळ कर्नाटक नाही, तर अनेक राज्यांत काँग्रेसची आर्थिक स्थिती चांगली नाही. कर्नाटक राज्यात ‘वक्फ बोर्डा’कडून शेतकरी, तसेच मंदिरांच्या सहस्रो एकर भूमी हडपल्या जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ‘वक्फ बोर्ड’ हिंदूंच्या भूमी हडप करत आहे. काँग्रेस केवळ भूमी हडप करण्याची ‘गॅरंटी’ देऊ शकते. झारखंड येथे भाजपला आणि महाराष्ट्र येथे महायुतीला चांगले वातावरण असून आम्ही अभूतपूर्व विजय प्राप्त करू.’’

या प्रसंगी दक्षिण भागाचे भाजपचे उमेदवार अमल महाडिक, राहुल चिकोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.