‘८.१.२०१९ या दिवशी दुपारी तीन साधिका रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील यज्ञवेदीच्या ठिकाणची भूमी शेणाने सारवत असल्याचे मी पाहिले. मलाही त्यांच्याप्रमाणे ‘ती भूमी शेणाने सारवावी’, असे वाटले. यापूर्वी, म्हणजे वर्ष २००१ मध्ये पहिल्यांदा मी भूमी शेणाने सारवली होती. त्यामुळे कु. माधवी पोतदार आणि कु. सोनाली खटावकर या साधिकांच्या समवेत मीही भूमी शेणाने सारवू लागले. त्या वेळी मला चैतन्य मिळून माझ्या शरिराला आणि हातांना गार संवेदना जाणवू लागल्या. तेवढ्यात मला सूक्ष्मातून ‘माझ्यासमोर पांढर्या रंगाची दैवी गाय उभी आहे’, असे दिसले. गायीभोवती प्रकाशमान स्वरूपातील चैतन्य होते. गायीचे चरण अगदी माझ्यासमोरच होते. मी लगेचच तिच्या पवित्र चरणी कृतज्ञताभावाने मानस नमस्कार केला. त्यानंतर मी पुन्हा शेणाने भूमी सारवू लागले. काही मिनिटांनंतर पाण्याची वाफ जशी हवेत विरून जाते किंवा एखाद्या फुलाच्या पाकळ्या जशा हवेत उडून जातात, तशी ती गाय अदृश्य झाली. मला आलेली ही अनुभूती मी माधवी आणि सोनाली यांना सांगितली. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘उद्या ऋषियाग असून तो गोलोकाशी संबधित आहे.’’ हे ऐकून मला पुष्कळ आश्चर्य वाटले; कारण मला दुसर्या दिवशी होणार्या यज्ञाविषयी काहीच ठाऊक नव्हते. या अनुभूतीच्या माध्यमातून मला दैवी गायीचे दर्शन दिल्याविषयी मी कृतज्ञ आहे.’
– सौ. योया वाले, एस्.एस्.आर्.एफ्. (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन), युरोप. (८.१.२०१९)