डोंबिवली येथील साधकांना गावी निघाल्यावर गुरुदेवांनीच रिक्शाचालकाच्या माध्यमातून साहाय्य केल्याचे जाणवणे

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्री. विजय आणि सौ. संगीता लोटलीकर रात्री १ वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकाहून गावी निघाल्यावर त्यांना गुरुदेवांनीच रिक्शाचालकाच्या माध्यमातून साहाय्य केल्याचे जाणवणे

श्री. विजय लोटलीकर                                      सौ. संगीता लोटलीकर

‘२६.१.२०२० या दिवशी आम्ही उभयता (मी आणि माझे पती श्री. विजय लोटलीकर) सायंकाळच्या रेल्वेने रत्नागिरीला माझ्या वडिलांना भेटायला निघालो. रात्री १ वाजता रेल्वे रत्नागिरी स्थानकावर पोचली. तेथून थोडे पुढे चालत गेल्यावर एका ठिकाणी ३ रिक्शाचालक उभे होते. यजमानांनी एका रिक्शाचालकाला विचारले, ‘‘कारवांची वाडी येथे येणार का ?’’ त्याने लगेच ‘‘हो’’ म्हटले. तेव्हा यजमानांनी त्याला ‘‘रिक्शाचे भाडे किती घेणार ?’’, असे विचारले. तेव्हा रिक्शाचालक म्हणाला, ‘‘तुम्हाला किती द्यायचे ते द्या !’’ यजमानांनी त्यांना ३ वेळा विचारल्यावर तिन्ही वेळा रिक्शाचालकाने तेच उत्तर दिले आणि तो पुढे म्हणाला, ‘‘ठीक आहे. (रिक्शेत) बसा ! मी काही तुमच्याकडून जास्तीचे पैसे घेणार नाही.’’ मग आम्ही त्या रिक्शात बसलो. तेव्हा काही अंतरावर गेल्यावर रिक्शा बंद पडली. तेव्हा तोच आम्हाला म्हणाला, ‘‘घाबरू नका. माझ्याजवळ पेट्रोल आहे. दोन मिनिटांत भरतो.’’ रिक्शात पेट्रोल भरून निघाल्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने ती बंद पडली. तेथून जवळच १० मिनिटांच्या अंतरावर माझ्या भावाचे घर होते. त्यामुळे यजमान त्यांना म्हणाले, ‘‘ठीक आहे. आम्ही चालत जातो.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘छेऽ छेऽऽ ! मी तुम्हाला अर्ध्या रस्त्यात कसे सोडीन ? तुम्हाला घरापर्यंत सोडूनच जाईन !’’ रात्रीचे १.३० वाजून गेले होते. तेव्हा आम्हा उभयतांना ‘हा साधारण रिक्शाचालक नसून आपल्याला प्रत्यक्ष देवच सोडायला आला आहे’, असे लक्षात आले. तेव्हा थंडी असल्याने त्या रिक्शाचालकाने त्याच्या डोक्याला ऊबदार कापड गुंडाळले होते. त्यामुळे आम्हाला त्याचा तोंडवळा नीट दिसला नाही. यजमानांनी त्या रिक्शाचालकाला रिक्शेचे ‘रात्रीचे भाडे’ म्हणून २०० रुपये दिले. त्याने केवळ १०० रुपयेच घेतले आणि १०० रुपये परत दिले. (प्रत्यक्षात रात्री १२ वाजल्यानंतर सर्व ठिकाणी रिक्शासह सर्व गाड्यांचे भाडे दुप्पट आकारतात.) त्या वेळी यजमानांना प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या चरित्रातील एका प्रसंगाची आठवण झाली. एकदा प.पू. बाबा सर्व भक्तांना घेऊन जात असतांना दाट अरण्यात त्यांची गाडी बंद पडली. तेव्हा एक गृहस्थ आले आणि त्यांनी सर्वांना पाणी दिले. चहासंबंधी विचारल्यावर त्यांनी चहाही आणून दिला. त्या वेळी एक भक्त म्हणाला, ‘‘दूध मिळाले असते, तर बरे झाले असते !’’

तेव्हा प.पू. बाबा त्या भक्तावर रागावले आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला ठाऊक आहे का ? कोण होते ते ?’’ त्या वेळी प्रत्यक्ष प.पू. बाबांनी भक्तांना ‘त्यांचे गुरु प.पू. श्री अनंतानंद साईश यांनीच सर्वांना पाणी आणि चहा आणून दिला’, हे लक्षात आणून दिले. त्याप्रमाणे या प्रसंगी आम्हा उभयतांनाही जाणवले, ‘प्रत्यक्ष देवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) रिक्शाचालकाच्या रूपात आमच्या साहाय्याला आला आहे.’ देवाने ही अनुभूती देऊन ‘तो अखंड आमच्या समवेत आहे’, याची आम्हाला प्रचीती दिली. त्यामुळे त्या प्रसंगी आमच्याकडून गुरुचरणी कृतज्ञता सतत व्यक्त होत होती. ’

(‘भक्ताची वा साधकाची अनुक्रमे देव किंवा गुरु यांच्यावरील श्रद्धा वृद्धींगत व्हावी, यासाठी ते त्याला अशा अनुभूती देतात. यावरून कठीण प्रसंगातही ‘देव किंवा गुरुदेव साधकाची श्रद्धा वाढून त्याची साधनेत लवकर प्रगती व्हावी, यासाठी किती प्रयत्नरत असतात, हे कळते ! याचसाठी आपण देव किंवा गुरुदेव यांच्या चरणी सर्वस्व अर्पण केले, तरी त्यांचे ऋण कधीही फेडू शकत नाही, तर त्यांच्या चरणी निरंतर कृतज्ञच राहू शकतो’, हे लक्षात येते.’ – संकलक)

– सौ. संगीता विजय लोटलीकर, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१५.३.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक