साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !

आज वैकुंठचतुर्दशी आहे त्यानिमित्ताने…

‘विष्णुभक्ती करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळालेली अमूल्य संधी म्हणजे ‘वैकुंठचतुर्दशी !’ वैकुंठचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार खुले असते. जो भक्त या दिवशी थोडीशीही विष्णुभक्ती करतो, त्याच्यासाठी वैकुंठधामात स्थान मिळणे सुनिश्‍चित आहे. ‘वैकुंठचतुर्दशीच्या निमित्ताने श्रीविष्णूच्या दिव्य वैकुंठधामाची प्राप्ती करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे शिकवण्यासाठी या लेखाच्या माध्यमातून साक्षात् श्रीविष्णु वैकुंठलोकाचे महाद्वार उघडून आपल्याला साधनेची पुढची दिशा देणार आहे. भगवंताच्या या भावलीलेबद्दल आपण त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करूया.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. वैकुंठचतुर्दशीचे पौराणिक महत्त्व

‘श्रीविष्णूचे ध्यान आणि त्याच्या कथेच्या श्रवणाने समस्त पापांचा नाश होतो, तसेच वैकुंठ धामाची प्राप्ती होते. याविषयी एक पौराणिक कथा आहे. ‘‘एकदा देवर्षि नारद पृथ्वीलोकी भ्रमण करत करत वैकुंठ धामी पोेचतात. श्रीविष्णूने त्यांना येण्याचे कारण विचारल्यावर देवर्षि नारद सांगतात, ‘हे प्रभु, आपले नाव कृपानिधान आहे. त्यामुळे आपले प्रिय भक्तच भवसागर तरून जाऊ शकतात; पण सामान्य नर-नारी त्यापासून वंचित रहातात. त्यामुळे आपण मला असा काही सोपा उपाय सांगा, ज्यामुळे सामान्य भक्तही आपली भक्ती करून मुक्ती मिळवू शकतील.’’

यावर श्रीविष्णु सांगतो, ‘‘हे नारद, कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशीला जो कुणी श्रद्धा-भक्तीने माझे पूजन करील, त्याच्यासाठी साक्षात् वैकुंठधामाचे द्वार उघडे होईल.’’ त्यानंतर श्रीविष्णु द्वारपाल जय-विजय यांना बोलावून कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशीला वैकुंठधामाचे द्वार उघडे ठेवण्याचा आदेश देतात. भगवान विष्णु म्हणतो, ‘‘जो भक्त या दिवशी माझे थोडेही नाम घेऊन पूजन करील, तो भक्त वैकुंठधाम प्राप्त करील. मृत्यूलोकात रहाणारा कोणताही भक्त असला, तरी तो विष्णुभक्ती करून आपले स्वतःचे स्थान वैकुंठधामात सुनिश्‍चित करू शकेल.’’ हे ऐकून नारदमुनींना पुष्कळ आनंद होतो. ‘सामान्य जीवही वैकुंठधामात प्रवेश करू शकेल’, यासाठी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटली.’ (संदर्भ : संकेतस्थळ)

२. श्रीविष्णूचे, म्हणजेच विष्णुस्वरूप गुरुदेवांचे सेवक हीच साधकांची खरी ओळख !

आपण सर्व जण विष्णुकार्यासाठी आलेले श्रीविष्णूचे सेवक आहोत. ‘मृत्यूला प्राप्त होणारे शरीर, दुःखी होणारे मन अथवा पालटणारी मती’ ही आपली खरी ओळख नाही, तर ‘श्रीविष्णूचे, विष्णुस्वरूप गुरुदेवांचे सेवक’, हीच आपली खरी ओळख आहे. अशा सर्व श्रीविष्णूच्या सेवकांना श्रीविष्णु वैकुंठलोकाचा मार्ग दाखवणार आहे. आपल्या अंतःकरणामध्ये अपार भक्तीभाव ठेवून आपण सर्वांनी या विष्णुलोकापर्यंत घेऊन जाणार्‍या भावमार्गाची ओळख करून घेऊया.

३. वैकुंठधामाचे वर्णन

३ अ. वैकुंठलोक ब्रह्मांडाच्या बाहेर आणि तिन्ही लोकांपेक्षा उच्च स्थानी असणे : देवाधिदेव महादेव कैलासलोकी निवास करतो. ब्रह्मदेव ब्रह्मलोकी वास करतो. त्याप्रमाणे भगवान विष्णूचा निवास वैकुंठलोकात आहे. वैकुंठलोक ब्रह्मांडाच्याही बाहेर आहे आणि तिन्ही लोकांपेक्षाही उच्च स्थानी आहे. वैकुंठधामाची व्यापकता किती असेल ?’, हे आपल्यासारख्या जिवांना कळणे अशक्यच आहे. वैकुंठलोकात श्री महाविष्णु महालक्ष्मीच्या समवेत वास करतो.

३ आ. परमानंद आणि शांती प्रदान करणारा वैकुंठलोक ! : जगत्पालक भगवान विष्णु वैकुंठात वास करतो. वैकुंठलोक म्हणजे आनंद आणि शांती प्रदान करणारा लोक आहे. भगवान विष्णूचे धाम असलेले वैकुंठ अत्यंत दिव्य आहे. वैकुंठधाम चेतन आणि स्वयंप्रकाशी आहे. पृथ्वीतलावर साधना करतांना आपल्याला अत्यंत आनंदमय स्थिती अनुभवायला मिळते. तो आनंद म्हणजे वैकुंठातील परमानंदाचा अंशही नसेल. ‘तेथील परमानंद म्हणजे काय असेल ?’, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

३ इ. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये वर्णिलेला वैकुंठलोक : श्रीमद्भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवंतानेच आपल्या परम धामाचे वर्णन केले आहे.

१. ‘हे अर्जुना, अव्यक्त भावाला परम गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त होऊन मनुष्य पुन्हा पृथ्वीवर परत येत नाही, तेच माझे परम धाम आहे.’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ८, श्‍लोक २१

२. ‘हे अर्जुना, माझे परम धाम ना सूर्य, ना चंद्र यांच्याद्वारे, ना अग्नी अथवा वीज यांद्वारे प्रकाशित आहे. माझे परम धाम तर स्वयंप्रकाशी आहे. या परम पदाला प्राप्त होऊन मनुष्य या संसारात पुन्हा येत नाही.’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १५, श्‍लोक ६

३ ई. भगवंताचा लोक हा स्वतःच्याच ब्रह्मज्योतीने प्रकाशित असणे : या श्‍लोकातून साक्षात् भगवंतानेच त्याच्या परम धामाचे वर्णन केले आहे. आपल्याला ठाऊक आहे की, या भौतिक जगाला, म्हणजे पृथ्वीलोकाला प्रकाशमान करण्यासाठी प्रकाशाचा स्रोत सूर्य, चंद्र, तारे इत्यादी आहेत; पण स्वतः भगवंत सांगतो की, त्याच्या परम धामाला प्रकाशमान करण्यासाठी सूर्य, चंद्र, अग्नी किंवा वीज यांची आवश्यकता नाही. भगवंताचा हा लोक स्वतः भगवंतापासून निघणार्‍या ब्रह्मज्योतीने प्रकाशित होतो. अशी ही दिव्य ब्रह्मज्योत असते.

अशा या भगवान विष्णूच्या वैकुंठलोकाची महती जाणणे, आपल्यासारख्या जिवांसाठी असंभवच आहे, तरीसुद्धा त्याच्या चरणी शरण जाऊन आपण वैकुंठलोकाचा महिमा आणि वैकुंठपती श्री विष्णूूचा महिमा अनुभवण्याचा प्रयत्न करूया.’

(क्रमशः)

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(संदर्भ : २६.११.२०२० या दिवशी भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतलेला ‘वैकुंठचतुर्दशी’ हा विषय )

भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426738.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक