भाववृद्धी सत्संग घेतांना साधिकेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सूक्ष्मातील उपस्थितीची अनुभूती येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. भाववृद्धी सत्संग घेण्यापूर्वी ‘भावप्रयोग योग्यरित्या घेऊ शकणार नाही’, असे वाटणे, साधक सहभागी होऊ लागल्यावर शांत वाटू लागणे आणि सत्संग रामनाथी आश्रमातील बैठक कक्षात होत असल्याचे जाणवून सत्संगाच्या वेळी आनंद जाणवणे

सौ. राजलक्ष्मी जेरे

‘१०.४.२०२० या दिवशी संध्याकाळी ६.३० वाजता मी भाववृद्धी सत्संगाची सिद्धता करत असतांना ‘लॉग इन’ (टीप) होण्यापूर्वी माझे मन विचलित झाले. त्या वेळी मला भाव जाणवत नव्हता. त्यामुळे ‘मी भावप्रयोग योग्यरित्या घेऊ शकेन कि नाही ?’, अशी मला काळजी वाटत होती. त्यानंतर सत्संगात साधक सहभागी होऊ लागले. मी त्यांना अभिवादन करत होते. त्या वेळी मला हळूहळू शांत वाटू लागले. काही मिनिटांनी मला वाटले, ‘रामनाथी आश्रमातील संतांचा भाववृद्धी सत्संग चालू होणार आहे. त्यासाठी एकामागून एक साधक येत आहेत. मी दाराजवळ उभी राहून सत्संगाला येणार्‍या साधकांना अभिवादन करत आहे.’ मला ही एक वेगळीच अनुभूती आली. त्यामुळे सत्संगाच्या वेळी मला पुष्कळ उत्साही वाटत होते आणि आनंद जाणवत होता.

टीप – माहितीजालावरील संगणकीय प्रणाली वापरण्यापूर्वी वापरकर्त्याचे नाव (युजरनेम) आणि संकेतशब्द (पासवर्ड) घालावा लागतो. त्यानंतर ती प्रणाली वापरता येते.

२. भावप्रयोग घेतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्याकडे पहात आहेत’, असे वाटून मनावरील ताण न्यून होणे आणि भावप्रयोग घेण्याच्या सेवेचे कर्तेपण घेत असल्याची जाणीव होणे

भावप्रयोग घेत असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्याकडे पहात आहेत’, असे मला वाटले. त्यानंतर माझ्या मनावरील ताण न्यून झाला. त्या वेळी ‘प्रत्येक भाववृद्धी सत्संग हा परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग आहे. ‘मी भावप्रयोग कसा सांगत आहे ?’, याचा काही विशेष संबंध नाही. भावप्रयोग सांगण्याच्या या लहानशा सेवेचा कर्तेपणा मी माझ्याकडे कसा घेत आहे ?’, हे माझ्या लक्षात आले. ‘सत्संगात परात्पर गुरु डॉक्टरांची उपस्थिती असल्यामुळे आणि साधकांचा त्यांच्याप्रती भाव असल्यामुळे साधकांना अनुभूती येतात’, असे मला जाणवले.

यातून देवाने माझा अहं दाखवला आणि ‘सत्संगात त्याचे चैतन्य कसे कार्यरत असते ?’, हेसुद्धा दाखवले. ही त्याची अपार कृपा आहे. मला ही अनुभूती दिल्याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. राजलक्ष्मी जेरे, सॅन डिएगो, अमेरिका. (१०.४.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक