उत्तरप्रदेश येथील धर्माभिमानी कु. शुभम् विश्वकर्मा (वय १८ वर्षे) याने कपाळाला टिळा लावून शाळेत जाण्यासाठी शिक्षकांशी केलेला संघर्ष !
१. शिक्षकांनी शाळेत टिळा न लावण्याविषयी सांगितल्यावर शुभम् याने केलेले प्रबोधन : ‘वर्ष २०१७ मध्ये मी इयत्ता अकरावीत शिकत होतो. तेव्हा शाळेतील एका शिक्षकांनी मला बोलावून सांगितले, ‘‘कपाळावर टिळा लावायचा नाही.’’ मी त्यांना म्हटले, ‘‘हे विद्यालय, म्हणजेच एक गुरुकुल आहे. येथे धर्माचे शिक्षण दिले जाते. मग मी टिळा का लावू शकत नाही ? आपल्या शाळेच्या नियमावलीत ‘टिळा लावायचा नाही’, असे लिहिलेले नाही.’’ तरीही त्यांनी मला ‘उद्यापासून टिळा लावून येऊ नकोस’, असे सांगितले.
२. शिक्षकांनी लावलेला टिळा पुसणे : दुसर्या दिवशी मी टिळा लावून शाळेत गेलो. तेव्हा त्या शिक्षकांनी मला त्यांच्याजवळ बोलावले आणि त्यांच्या रूमालाने माझ्या कपाळावरील टिळा पुसला. तेव्हा मला पुष्कळ क्रोध आला आणि अश्रू अनावर झाले.
३. उपमुख्याध्यापकांनी छोटा टिळा लावण्यास सांगितल्यावर कु. शुभम् याने बाणेदारपणे ‘मोठ्या टिळ्यातून शक्ती मिळते’, असे सांगणे : नंतर त्या शिक्षकांनी मला उपमुख्याध्यापकांकडे नेले. त्यांनी मला सांगितले, ‘‘तू टिळा लावून येऊ शकतोस; परंतु लहानसा टिळा लावून ये.’’ त्यावर मी म्हटले, ‘‘मला टिळ्यातून शक्ती मिळते; म्हणून मी मोठा टिळाच लावून येणार. तुम्हाला हवे, तर तुम्ही मला या शाळेतून काढून टाकू शकता.’’
त्यानंतर मला टिळा लावून शाळेत जाण्याची अनुमती मिळाली. हे सर्व श्री गुरुदेवांच्या कृपेने झाले.’
– कु. शुभम् विश्वकर्मा (वय १८ वर्षे), जिल्हा गाजीपूर, उत्तरप्रदेश. (५.९.२०१९)