भारतात सामरिक संस्कृतीचा अभाव आहे का ?

‘समर विजयानंतर सत्तांतर होते तरी, नाहीतर ते टळते तरी. सामरिक विजय हा राष्ट्राचा असतो. प्रत्यक्ष युद्ध जरी सेना करत असेल, तरी विजयामध्ये वाटा सर्व समाजधुरिणांचा असतो. जिथे समाज विभागलेला असतो, तिथे अशी स्थिती नसते. परकियांच्या हातात सत्ता जाऊ न देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, हे सामरिक संस्कृती जिवंत असल्याचे लक्षण आहे.

जर समराच्या शेवटी पराभवामुळे सत्तांतर झालेच आणि परकीयांच्या हातात सत्ता गेलीच, तर ज्या इर्षेने समाज अन् राष्ट्र युद्धात परकियांचा पराभव करून स्वकीयांची सत्ता परत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात, तसेच जसे यश मिळवले जाते, त्या प्रमाणात सामरिक संस्कृति सुदृढ आहे, असा निष्कर्ष काढायला हरकत असू नये.

१. राष्ट्रीय हितासाठी युद्ध करणे, असा विश्‍वास म्हणजे सामरिक निष्ठा !

विजयाच्या मागे सामरिक कौशल्य असते. कौशल्य हे मुख्यत्वे सेनापती आणि सैन्य यांचे असते. सामरिक सिद्धता ही सैन्य आणि राष्ट्र अशी दुहेरी असते. युद्धासाठी सिद्ध असण्यामध्ये सेना आणि राष्ट्र या दोघांचाही वाटा असतो. सैन्याला योग्य ते मनुष्यबळ आणि शस्त्रबळ मिळण्यासाठी पूर्ण राष्ट्राचा पाठिंबा हवा असतो. त्याशिवाय सामरिक निष्ठा ही निराळी. राष्ट्रीय हितासाठी युद्ध करणे, हे पूर्णपणाने योग्य आणि आवश्यक आहे, असा विश्‍वास असणे ही सामरिक निष्ठा होय ! सामरिक कौशल्य सिद्धता आणि निष्ठा यांची मुळं राष्ट्रीय संस्कृतीच्या भूमीतून पोसली जातात. जोपर्यंत ती मुळं उघडी पडत नाहीत, तोपर्यंत सामरिक संस्कृती तग धरून असते.

२. काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्राकडे नेणे, ही सामरिक संस्कृती नव्हे !

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या सामरिक क्षेत्रातील कामगिरीकडे बघतांना राजकीय नेतृत्वाने जे निर्णय घेत त्यांचा आणि सैन्यदलांच्या कारवाईचा विभिन्न आढावा घ्यायला हवा. काश्मीरमध्ये सैन्याची कामगिरी चांगलीच म्हणायला हवी; मात्र विजय मिळवून पुढे जाणार्‍या सैन्यावर (तत्कालीन) पंतप्रधानांनी निर्बंध घातले. एरव्ही भारतीय सेना मुजफ्फराबादपर्यंत जाऊ शकेल, असा अंदाज लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंग पाटील-थोरात यांनी व्यक्त केला होता. तसेच काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्राकडे घेऊन जाणे, या गोष्टी वादातीत नाहीत आणि सामरिक संस्कृतीची चुणूक दाखवणार्‍या निश्‍चितच नाहीत. याचसमवेत काश्मीरमध्ये युद्धे होतच राहिली.

३. तत्कालीन राजकीय नेतृत्वाच्या अभावामुळे भारताची झालेली हानी !

वर्ष १९६५, १९७१ आणि १९९९ मध्ये प्रत्येक वेळी पाकने आक्रमण केले आणि त्याला भारताने दिलेले प्रत्युत्तर योग्य होते. सियाचीनमध्ये पाक स्वतःचा हक्क कपटाने प्रस्थापित करू पहात आहे, ही जाणीव झाल्यावर वेळच्या वेळी भारताने पावले उचलली इतकेच !

वर्ष १९६२ मध्ये चीनने भारताचा पराभव केला. सेनेची आणि राजकीय नेतृत्वाची कामगिरी तितकीच असमाधानकारक होती. वर्ष १९७१ मध्ये भारतीय सेनांनी फारच दर्जेदार कामगिरी केली. खंबीर राजकीय नेतृत्वाने अमेरिकेच्या धमक्यांना भीक घातली नाही आणि भारतीय सैन्यदलांना आपापल्या क्षेत्रात जरूर ते स्वातंत्र्य दिले. अर्थातच २ सहस्त्र वर्षांच्या इतिहासात एक नवीन सोनेरी पान लिहिले गेले. कौशल्याच्या प्रांतात पारंगत असलेले लेफ्टनंट जनरल सगत सिंग यांनी ‘ऑपरेशनल आर्ट’ भारतात आहे, हे दाखवून दिले; पण सिमल्याला झालेल्या तहाच्या बोलण्याच्या वेळी तत्कालीन भारतीय पंतप्रधानांनी पाक पंतप्रधानांच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवला आणि ९० सहस्त्र पाक युद्धबंदी कुठलीही हमी न घेता मुक्त केले, अशा प्रकारे युद्धात विजय मिळवून जमा केलेले ‘भांडवल’ क्षणात नाहीसे झाले. ‘तो क्षण क्षणात गेला’, असा विलाप मागे राहिला. पाकिस्तानाच्या नाड्या भारताच्या हातात होत्या, त्याचा योग्य तो उपयोग केला गेला नाही.

श्रीलंकेमध्ये त्यांच्या साहाय्याला जाण्याचा राजकीय निर्णय पूर्ण विचारविनिमय करून घेतला होता, असे वाटत नाही. असा निर्णय वादातीतच असायला हवा; कारण युद्धाचे परिणाम संपूर्ण राष्ट्राला भोगायला लागतात, केवळ सरकारला नाही. राजकीय नेतृत्वाचा हा निर्णय भारताला पुष्कळ महागात पडला.

४. सिकंदराने भारतावर आक्रमण करून पोरसावर मिळवलेला विजय आणि भारतीय मनोवृत्ती

सिकंदराने इ.स.पू. ३२६ मध्ये भारतावर आक्रमण केले. ज्या युद्धात त्याने पोरसाचा पराभव केला. त्याला ‘हिडॅस्पिस’चे युद्ध म्हणतात. ‘हिडॅस्पिस’ हे नदीचे नाव. भारतीय याच नदीला त्या काळी ‘वितस्ता’ म्हणत आणि आता ‘झेलम’ म्हणतात. मोठी निकराची लढाई झाली. सिकंदर हा पुष्कळ कसलेला सेनानी होता. त्याच्या समोर पोरस फिका पडला. तो सिकंदराच्या हुलकावण्यांना बळी पडला. दुथडी भरून वाहणारी वितस्ता त्याच्या पायदळाने तराफ्यांचा आश्रय करून पार केली. अशी वदंता आहे की, भारतीय घोडदळाने त्यांच्यावर चालही केली नाही. ‘हे पायदळाचे काम आहे, आमचे नव्हे’, ही भारतीय घोडदळाची मनोवृत्ती सिकंदराच्या पथ्यावर पडली. पोरसाची सलग सेना जिथे विभागलेली, तिथे बाकी समाज हा विभागलेला असणारच.

काही काळाने सिकंदराचे घोडदळही उतार पाहून पायदळाला येऊन मिळाले. सिकंदराची व्यूहरचना पुरी झाली. त्याने तो व्यूह चाकासारखा वळवला आणि मग सिकंदराच्या घोडदळाने उजव्या डाव्या बगलांच्या बाजूंनी समोरच्या पोरसावर आक्रमण केले. एका बाजूला वितस्ता वहात होती. भारतीय सेनेचे काही हत्ती उधळले. या निकराच्या युद्धात १ सहस्त्र ग्रीक, तर त्याच्या १२ पट पोरसाचे सैनिक कामी आले. शिवाय ९ सहस्त्र सिकंदराने कैदी नेले ते निराळेच; पण आपल्या पारंपारिक स्मृतीत वर्णन कशाचे असते ?, तर ते पोरसाने ‘मी राजा आहे. मला राजासारखे वागव’, असे सिकंदराला कसे ठणकावून सांगितले त्याचे ! भारताची २१ पट हानी झाली, त्याचे शल्य नाही ते नाहीच. भारताचा पराभव झाला, हेदेखील स्मृतीतून जवळजवळ पुसले गेले आहे. ग्रीक आणि भारतीय संस्कृतीचा संगम कसा झाला ? याचे मात्र रसभरीत वर्णन असते. तो काय प्रीती संगम म्हणावा का ? इतिहासातून ‘असे हे घडले’ याचे आकलन, तर झालेच पाहिजे.

५. युद्धाविषयी अर्थशास्त्राची शिकवण आणि भूमिका

सिकंदराने वितस्तेवरील युद्धात भारतियांवर विजय मिळवला. त्या काळात तक्षशीलेला मनन, चिंतन करून विजिगीषू म्हणजे विजयाची इच्छा करणार्‍या राजाने राज्य कसे स्थापन करावे आणि ते समुद्रापासून हिमालयापर्यंत कसे वाढवावे, या विषयाला केंद्रस्थानी ठेवून अर्थशास्त्राची निर्मिती करायला हवी. अर्थातच त्यात परराष्ट्रनीती आणि युद्धशास्त्र यांचा समन्वय आलाच. प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी राजाने आपल्या नेहमीच्या हत्तीवर किंवा घोड्यावर आणि अग्रभागी आपल्यासारखा दिसणारा मनुष्य बसवावा आणि स्वतःमागे राहून जरूर ते निरीक्षण करून योग्य त्या आज्ञा द्याव्यात, असे अर्थशास्त्र सांगते. चतुरंग सेनेच्या सर्व अंगांचा कसा आणि कुठे उपयोग करावा, ते अर्थशास्त्र सांगते. संरक्षण सिद्धतेच्या पलीकडे परराष्ट्रावर आक्रमण करण्याची शक्तीही असलीच पाहिजे. ‘मित्र राष्ट्र’ ही आवश्यकता टाळता येत नाही, अशी अर्थशास्त्राची शिकवण ! एरव्ही ग्रंथांची उत्तम पारंपारिक स्मृती असलेल्या देशात युद्धातील पराभवांची आणि अर्थशास्त्राची तेवढी विस्मृती होते. हे कशाचे निदर्शक आहे ?

‘युद्ध टाळले पाहिजे. विजयी परकियांची गुलामी चालेल किंवा त्यांचेच मांडलिक बनू; पण युद्ध करणे नको; कारण पराभव अटळ आहे.’ कालांतराने अशा मानसिकतेची निर्मिती, तर भारतात झाली नाही ना ?

६. हिडॅस्पिसचे युद्ध आणि पानिपतचे तिसरे युद्ध यांतील साम्य

हिडॅस्पिसचे युद्ध आणि पानिपतचे तिसरे युद्ध यात अनुमाने २ सहस्र १०० वर्षांचे अंतर आहे; पण परकीय यशस्वी सेनापतींनी अवलंबिलेल्या युद्धनीतीतील सारखेपणा इतका ढोबळ आहे. हुलकावणी देऊन शिताफीने नदी उतरून एतद्देशीय सेनापतीचा आणि राजाचा वेध घेऊन त्यांच्यावर आक्रमणे करणे अन् उत्तम युद्धनीतीचा उपयोग करून भारतीय सत्ताधिशांवर विजय मिळवणे, हे साम्य खटकणारे आहे. मराठ्यांचे सेनानी हत्तीवरील हौद्यात अग्रभागी, तर दुराण्यांचा सेनानी अहमदशाह अब्दाली; मात्र सैन्याच्या मागे असे. तिथून त्याने निरीक्षण केले आणि आवश्यकतेनुसार व्यूहरचना पालटल्या. त्याने राखून ठेवलेल्या पथकांना निर्णयाच्या ठिकाणी योग्य वेळी धाडले. जणू काही अर्थशास्त्राचा अभ्यास त्यानेच केला होता. सेनापती स्वतःच हातघाईच्या युद्धात उतरल्यावर त्याचे काम कोण करणार ? ‘सिकंदर’ आणि ‘अब्दाली’ हे प्रज्ञावंत सेनापती ! त्यांना कुठल्याच शास्त्राची आवश्यकता नव्हती; पण इतरांना ती असते.

७. अद्ययावत शस्त्रांच्या अभावामुळे भारताने युद्धात मिळवलेल्या विजयांची संख्या अल्प

गेल्या १ सहस्र वर्षांत भारताने युद्धात मिळवलेल्या विजयांची संख्या इतकी अल्प कशी ? या प्रश्‍नाचे उत्तर शोधून पहाता हाती काय लागते ? याचे उत्तर आहे अद्ययावत शस्त्रांचा अभाव ! हे कारण एका मर्यादेपर्यंत योग्य आहे. तलवारींचे उदाहरण घ्या. १७ व्या शतकातदेखील तलवारींची पाती युरोपमधून आयात केलेली असत; कारण योग्य प्रकारचे पोलाद भारतीय बनवूच शकत नव्हते. अशोकाच्या काळात म्हणजे इ.स. पूर्व २५० च्या सुमारास मिश्र धातूचा ७ मीटर उंचीचा उभारलेला स्तंभ देहलीला आजदेखील उभा आहे. त्यानंतर ते शास्त्रीय ज्ञान आणि ती कला १ सहस्र ५०० वर्षांत नाहीशी कशी झाली ? त्या क्षेत्रातील काम करणार्‍या धुरीणांची प्रतिष्ठा जर समाजात पुष्कळ अल्प झाली असेल किंवा अजिबात उरली नसेल, तर ४-५ पिढ्यांत पारंपारिक ज्ञानाचा आणि कौशल्याचा लोप झाला असावा. समाज विदीर्ण होण्याची लक्षणे आणि निराळी ती काय असणार !

याउलट जपानमध्ये १ सहस्त्र वर्षांपूर्वी ‘सामुराई’ तलवारी निर्माण करण्याची प्रक्रिया चालू झाली. पात्याची धार, तर अवश्य टिकलीच पाहिजे; पण पाते लवचिकही राहिले पाहिजे. एरव्ही ते मोडेल. ही तलवार वापरणार्‍याची आवश्यकता भागवायला मिश्र धातुकर्मी आणि कारागीर एकत्र आले. अतिशय कठीण अशा पोलादाचा बाहेरून उपयोग करून पात्याचा गाभा मात्र लवचिक असलेल्या पोलादाचा बनवावा, ही शास्त्रीय कल्पना ! तसे पाते प्रत्यक्षात बनवून योद्धयाला हवी तशी मूठ बसवून देणे, ही कारागिराची क्षमता. त्यात कलेचा आणि उद्योगाचा भाग आला. या सर्वांचा संगम झाला; म्हणून तर सामुराई अस्तित्वात आली. एरव्ही ती बनली नसती. त्या तिन्ही क्षेत्रातील धुरीणांना एकत्र येणे आवश्यक होते. विभागलेल्या समाजात असे होणे अशक्य आहे.

दुसर्‍या महायुद्धामध्ये युरोपवर समुद्रमार्गांनी आक्रमण करण्यासाठी ‘कृत्रिम’ बंदरांची आवश्यकता भासली. ती कल्पना ‘मलबेरी हार्बर’ म्हणून साकारही झाली. पंतप्रधान चर्चिल स्वतः कल्पक योजक शास्त्रज्ञ आणि कारागिरी गोदीतील तंत्रज्ञ अन् कामगार यांची ती एकत्रित कामगिरी ! सर्व क्षेत्रातील धुरीण विभागलेल्या समाजात असे एकत्र होणे केवळ अशक्य !

८. ‘युद्धात विजयी होणे’, हाच धर्म !

ब्रिटिशांनी श्रीरंगपट्टनमला टिपू सुलतानला हरवले. वेलिंग्टनचे ‘ड्यूक’ या लढाईत सहभागी होते. त्यांनी स्वतःचे कौशल्य हिंदुस्थानातील अनुभवाने वाढवले. पुढे वसईला मराठ्यांना हरवले. या लढाया पार हिरीरीच्या झाल्या. त्यातून ड्यूक पुष्कळ काही शिकले. त्या अनुभवाचा उपयोग त्यांना वॉटर्लूची लढाई नेपोलियनच्या विरुद्ध जिंकण्यात झाला. भारतियांनी मात्र ‘झाले गेले गंगेला मिळाले’, असे म्हणून पराजयाकडे दुर्लक्ष केले आणि युद्धाकडेच पाठ फिरवली.

युद्ध हा ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या महाकाव्यांचा गाभा आहे. भारतीय देवतांचे चेहरे सस्मित असतात; पण सर्व शस्त्रधारी दिसतात. या विरोधाभासाचा उलगडा काय ? युद्धाला स्वतःचा असा धर्म आहे. ‘युद्धात विजयी होणे’, हा धर्म आहे.

९. यश मिळवण्यासाठी आक्रमण आणि कुटनीती वापरणे आवश्यक !

अवश्य असेल, तेव्हाच शांती प्रस्थापित करण्यासाठी साधन म्हणून बहुजनहितासाठी केलेले युद्ध हेच ‘धर्मयुद्ध’ ! त्यात यश हे मिळवलेच पाहिजे. यश मिळवण्यासाठी आक्रमण आणि कुटनीती वापरली पाहिजे, हे पटवून घेणे भारतियांना अवघड वाटते. कर्णाच्या रथाचे चाक भूमीने गिळले. याची कणव भारतीय मनात घर करून आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याचे कर्तव्य समजवावे लागते; पण बहुसंख्य भारतीय श्रीकृष्णाच्या सामरिक शिकवणीकडे थोड्या साशंकतेने बघतात, असे वाटते.

भारतीय मनाला विजयाची तहान का नाही ? विश्‍वातील बहुतेक धर्म हे शांतिप्रिय असतात. भारतातील धर्म तर निश्‍चित आहे; पण त्या धर्माचे पालन करायला संधी तरी मिळाली पाहिजे. कलिंगाची लढाई न जिंकताच अशोक शांतता प्रस्थापित करू शकला असता का ?

१०. भारतात गीतेमध्ये अहिंसा दिसण्यामागे सामरिक संस्कृतीचा अभाव ?

नेपोलियनच्या विरुध्द युद्धात कोणीच टिकत नव्हते. प्रशियाची गतपण तीच झाली; पण प्रशिया युद्धापासून दूर पळाला नाही. त्याच देशातील क्लौझवित्स यांनी युद्धाचा सखोल अभ्यास करून युद्धशास्त्राची निर्मिती केली. तो ग्रंथ अजरामर झाला; कारण त्या ग्रंथात युद्धाविषयी मौलिक विचार आहेत. त्या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर कर्नल मॉड या ब्रिटीश अधिकार्‍याने २० व्या शतकाच्या आरंभास केले आणि आश्‍चर्य म्हणजे प्रस्तावनेचा समारोप करतांना वाचकाला सांगितले की, युद्धापूर्वी कमकुवत झालेल्या मनाला परत युद्धप्रवण करण्यासाठी भगवद्गीतेपेक्षा चांगला उपदेश दुसरा नाही. भारतात मात्र याच गीतेत ‘अहिंसा’ दिसू लागली. सामरिक संस्कृतीचा अभाव हे या मागचे कारण असू शकेल का ?

११. भारतियांनी ब्रिटनकडून शिकणे आवश्यक !

ब्रिटनचे वैशिष्ट्य आहे की, कित्येक शतकात त्या देशाला पराभव ठाऊक नाही. चढ-उतार पाहिले इतकेच ! त्या देशाकडून शिकायला हवे. ब्रिटनने शत्रूला स्वतःच्या भूमीपासून दूर ठेवले. युद्ध शत्रूच्या देशात जाऊन केले. स्वतःच्या भूमीवर नाही. सामरिक संस्कृती जिवंत असलेल्या समाजातील सुविद्य सर्व क्षेत्रातील धुरीणांना युद्ध विषयाची बर्‍यापैकी जाण असते. जरी युद्ध करणे, हे सशस्त्र सेनेचे काम आहे, तरी युद्धाचे स्वरूप समजावून घेणे, सर्व क्षेत्रातील जिज्ञासू व्यक्तींना शक्य आहे. युद्धातील पराभवाचे परिणाम पुष्कळ भयंकर असतात आणि पराभवांची माळच लागली, तर सर्वकाही म्हणजे स्वत्वदेखील नाहीसे होते. मग झाडाच्या जागी केवळ खोडच उरते.’

लेखक : (निवृत्त) लेफ्टनंट जनरल अशोक जोशी आणि (निवृत्त) एअर कॉमॉडॉर अविनाश वळवडे

(संदर्भ : ‘धर्मभास्कर’, फेब्रुवारी २०१६)